संघर्षातून यशाचा शिखर गाठला! देवगाव–देवळीच्या अमोल महाजनची पोलिस दलात निवड
![]()
संघर्षातून यशाचा शिखर गाठला!
देवगाव–देवळीच्या अमोल महाजनची पोलिस दलात निवड
अमळनेर प्रतिनिधी :
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश कसे मिळवता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण देवगाव–देवळी येथील अमोल अरुण महाजन याने घालून दिले आहे. महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचा माजी विद्यार्थी असलेल्या अमोलची पालघर येथे पोलीस पदावर निवड झाली असून, गावासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब ठरली आहे.
अमोलचे प्राथमिक ते दहावीपर्यंतचे शिक्षण महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल, देवगाव–देवळी येथे झाले. त्यानंतर बारावी पूर्ण करताच त्याने पोलीस भरतीचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून कठोर तयारी सुरू केली. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती—वडील शेतीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते, तर आई आशासेविका म्हणून कार्यरत होती. दोन भावंडांमध्ये अमोल मोठा असल्याने जबाबदारीची जाणीव लहानपणापासूनच होती. शिक्षणासोबतच कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्याने कामधंदाही केला.
पोलीस भरतीची तयारी करताना अमोलला स्वतःवर पूर्ण विश्वास होता. त्याच्या मेहनतीचे फळ म्हणून त्याने लेखी परीक्षेत शंभर पैकी तब्बल ८९ गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. या यशामुळे त्याच्या संघर्षाला खऱ्या अर्थाने यशाची जोड मिळाली.
देवगाव–देवळी या गावात शिक्षणाची मजबूत पायाभरणी आहे. गावात दहावीपर्यंत शाळेची सुविधा असल्याने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड आणि स्पर्धेची भावना वाढीस लागली आहे. मागच्या वर्षी या गावातून सहा ते सात विद्यार्थ्यांची पोलीस दलात निवड झाली असून, ही परंपरा पुढेही कायम राहील, असा विश्वास व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, गावातील माजी विद्यार्थी व ग्रामस्थांच्या सहकार्याने २०२२-२३ मध्ये ‘संघर्ष अभ्यासिका’ सुरू करण्यात आली. या अभ्यासिकेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी योग्य वातावरण आणि मार्गदर्शन मिळत आहे. याच अभ्यासिकेतून प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वी होत असून, यशस्वी माजी विद्यार्थीच नव्या पिढीला मार्गदर्शन करत आहेत.
भविष्यात देवगाव–देवळी हे गाव ‘शिक्षणाचे माहेरघर’ म्हणून ओळखले जाईल आणि आणखी अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत यश संपादन करतील, असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. सध्या देखील चार ते पाच विद्यार्थी पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी होण्याच्या तयारीत असून, त्यांच्या यशाबद्दल पालकांमध्ये आशावाद आहे.
अमोलच्या यशानंतर गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थ व मित्रपरिवाराने वाजतगाजत मिरवणूक काढून त्याचे औक्षण करून भव्य स्वागत केले. तसेच अमळनेर येथे मराठी लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादक, शिक्षक व पत्रकार ईश्वर आर. महाजन यांनी अमोलचा शाल व बुके देऊन सत्कार करत त्याला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी त्याचा मित्रपरिवारही मोठ्या संख्येने उपस्थित होता.
अमोल महाजनच्या या यशाबद्दल
महात्मा फुले हायस्कूलचे अध्यक्ष विलासराव शांताराम पाटील, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. तसेच संपूर्ण गावकऱ्यांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अमोल महाजनचे यश हे केवळ एका व्यक्तीचे नसून, संपूर्ण गावाच्या एकजुटीचे, कष्टाचे आणि शिक्षणावरील दृढ विश्वासाचे जिवंत प्रतीक असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.



