खडके ग्रामस्थांकडून दुहेरी यशाचा जल्लोष; प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या कन्यांचा उदया भव्य नागरी सत्कार
![]()
खडके ग्रामस्थांकडून दुहेरी यशाचा जल्लोष; प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या कन्यांचा आज भव्य नागरी सत्कार
अमळनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील खडके गावाने पुन्हा एकदा गुणवत्तेची परंपरा जपत अभिमानास्पद यश संपादन केले आहे. गावातील कु. प्रांजल योजना वसंत पाटील आणि कु. मानसी योजना वसंत पाटील या दोन कन्यांची महाराष्ट्र नागरी कृषी सेवा परीक्षेत (MPSC-2024) अनुक्रमे Class-1 (कृषी उपसंचालक) आणि Class-2 (मंडळ कृषी अधिकारी) या पदांवर निवड झाल्याने गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
या दुहेरी यशानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून, हा सोहळा शनिवार, दि. ४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता खडके येथे संपन्न होणार आहे. गावकऱ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी मा. खासदार स्मिता वाघ राहणार असून, सत्कार समारंभाचे उद्घाटन मा. आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला मा. कपिल पवार (सहआयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक), मा. मयूर भंगाळे (प्रांताधिकारी, अमळनेर), मा. दत्तात्रय निकम (पोलीस निरीक्षक), तसेच मा. जयदीप पाटील (अध्यक्ष, नोबल फाउंडेशन, जळगाव) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
याशिवाय विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, मार्गदर्शक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून या यशस्वी कन्यांचा गौरव करणार आहेत. प्रांजल व मानसी या दोघींनी कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर हे यश मिळवले असून, त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.
ग्रामस्थ मंडळींनी या दोन्ही कन्यांच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. हा नागरी सत्कार सोहळा केवळ गौरवाचा नव्हे, तर शिक्षण, परिश्रम आणि चिकाटीच्या मूल्यांना सलाम करणारा प्रेरणादायी सोहळा ठरणार आहे असे पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित सानेगुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्र संचालक विजयसिंह पवार यांनी मराठी लाईव्ह न्युजशी बोलतांना सांगितले


