राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने श्रीमती शैला बैसाणे यांचा सन्मान
![]()
राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने श्रीमती शैला बैसाणे यांचा सन्मान
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर येथील नवीन माध्यमिक विद्यालय, अंतुर्ली-रंजाणे येथे कार्यरत असलेल्या कर्तव्यदक्ष शिक्षिका श्रीमती शैला गंगाधर बैसाणे यांना ध्येय एज्युकेशन फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
पुणे येथील ग.दि. माडगुळकर नाट्यगृह, निगडी येथे आयोजित ध्येय एज्युकेशन आयकॉन समिट 2026 हा भव्य राज्यस्तरीय सोहळा उत्साहात पार पडला. या प्रतिष्ठित कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर, छत्रपती संभाजीनगरचे उपजिल्हाधिकारी शुभम पवार, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कोकरे, शिक्षण मंडळाचे सभापती नानासाहेब शिंदे, कुंडलीक नेमाने, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त नंदकुमार सागर, तसेच ध्येय एज्युकेशन फाऊंडेशनचे अध्यक्ष सुदाम शेंडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या सोहळ्यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व राष्ट्रपती पुरस्कार विजेते दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या हस्ते श्रीमती बैसाणे यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि शाल देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधून अत्यंत काटेकोर आणि पारदर्शक प्रक्रियेव्दारे पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली होती, हे विशेष उल्लेखनीय आहे.
श्रीमती बैसाणे गेल्या २७ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी त्यांनी विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सृजनशीलता आणि मूल्यांची जपणूक केली आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे अनेक विद्यार्थी घडले असून समाजात त्यांचे योगदान मोलाचे ठरत आहे.
या यशाबद्दल शाळेचे चेअरमन, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, गावकरी तसेच विद्यार्थ्यांनी श्रीमती बैसाणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

