अमळनेरात मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण मोहीम; ३ ते ५ एप्रिलदरम्यान शहरभर कॅम्प नावे पडताळणी, मॅपिंगसाठी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
![]()
अमळनेरात मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण मोहीम; ३ ते ५ एप्रिलदरम्यान शहरभर कॅम्प
नावे पडताळणी, मॅपिंगसाठी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
अमळनेर प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अमळनेर नगरपरिषदेत मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण (SIR) मोहीम सुरू करण्यात आली असून ३ ते ५ एप्रिल २०२६ दरम्यान शहरातील विविध भागांत कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत 2002 च्या मतदार यादीचा आधार घेऊन 2025 च्या यादीतील नावांचे मॅपिंग (Mapping) व पडताळणी (Verification) केली जाणार आहे.
शहरातील लक्ष्मी माता मंदिर परिसर, बंगाली फाईल, रामवाडी, केशव नगर, आयोध्या नगर, ज्ञानेश्वर कॉलनी, ताबेपुरा सानेनगर, शिवशक्ती चौक, IUDP कॉलनी, जिनगर गल्ली, पवन चौक, ढेकू रोड, मुंदडा नगर, शिरूड नाका आदी ठिकाणी सकाळी १० वाजल्यापासून कॅम्प होणार आहेत. या कॅम्पमध्ये संबंधित भागांचे BLO (बूथ लेव्हल अधिकारी) व पर्यवेक्षक उपस्थित राहून नागरिकांच्या मतदार यादीतील नावांची तपासणी, दुरुस्ती व समावेशाची प्रक्रिया पार पाडतील.
या मोहिमेअंतर्गत कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे एकत्रित करणे, बोगस अथवा अवैध नावे ओळखून वगळणे, तसेच नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची नावे योग्य प्रकारे नोंदवलेली आहेत का याची खात्री करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. अनेकदा नागरिक मतदानाच्या दिवशी नाव यादीत नसल्यामुळे अडचणींना सामोरे जातात; २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी अशा समस्या टाळण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
नगरपरिषद प्रशासनाने सर्व संबंधित पर्यवेक्षकांना कॅम्प वेळेत पार पाडण्याच्या सूचना दिल्या असून कामकाजाचे फोटो नोंदविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नागरिकांनी संबंधित कॅम्पमध्ये उपस्थित राहून आपली व कुटुंबीयांची नावे तपासून घ्यावीत तसेच इतरांपर्यंत ही माहिती पोहोचवावी, असे आवाहन मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.
या उपक्रमासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती व सर्व नगरसेवकांनी सहकार्य केले असून नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे मोहीम यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

