“मी आई जिजाऊ”तून संस्कारांचा जागर; पोदार लर्न इंग्लिश स्कूलच्या उद्घाटनाने अमळनेरात उभा राहिला प्रेरणादायी सोहळा
1 min read

“मी आई जिजाऊ”तून संस्कारांचा जागर; पोदार लर्न इंग्लिश स्कूलच्या उद्घाटनाने अमळनेरात उभा राहिला प्रेरणादायी सोहळा

Loading

“मी आई जिजाऊ”तून संस्कारांचा जागर; पोदार लर्न इंग्लिश स्कूलच्या उद्घाटनाने अमळनेरात उभा राहिला प्रेरणादायी सोहळा

अमळनेर प्रतिनिधी
मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क
शिक्षण, संस्कृती आणि कलेचा संगम जेव्हा एकाच व्यासपीठावर अनुभवायला मिळतो, तेव्हा तो कार्यक्रम केवळ औपचारिक राहत नाही, तर तो समाजमनावर ठसा उमटवणारा सोहळा ठरतो. अमळनेर येथे पोदार लर्न इंग्लिश स्कूलच्या उद्घाटनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांनी अशीच एक संस्मरणीय अनुभूती दिली.
विशेष आकर्षण ठरलेली “मी आई जिजाऊ” या विषयावरील भव्य वेशभूषा स्पर्धा म्हणजे जणू इतिहासाचे जिवंत दर्शनच होते. महिलांनी राजमाता जिजाऊंच्या भूमिकेतून मातृत्व, संस्कार आणि स्वराज्याची प्रेरणा प्रभावीपणे साकारली. त्यांच्या अभिनयातून उपस्थितांना शिवचरित्रातील तेजस्वी अध्याय अनुभवायला मिळाला.
या स्पर्धेत वैशाली सपकाळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर प्रगती चंद्रकांत कंखरे द्वितीय आणि मेघना यतीन पवार तृतीय ठरल्या. केया प्रमोद खैरनार आणि रागिणी जयंत पाटील यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. या सर्व विजेत्यांचा सन्मान “माहेरची साडी” फेम अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते करण्यात आला.
लहानग्यांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेने कार्यक्रमात निरागसतेची आणि कल्पकतेची रंगत भरली. पार्थ रोहित ठाकूर, उमैना सैफी, सैफुद्दीन जावेद, आर्या ब्राह्मणकर, रुद्रांश येवले, सवय जैन या बालकांनी आपल्या वेगवेगळ्या वेशभूषांमधून प्रेक्षकांची मने जिंकली.

तसेच, रंगभरण व चित्रकला स्पर्धेत नर्सरी ते पहिलीच्या गटातील विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचा सुंदर आविष्कार सादर केला. दुर्वा प्रशांत पवार (प्रथम) यांना सायकल, अरुण सपकाळे (द्वितीय) यांना एज्युकेशन लॅपटॉप, तर संकेत हरिओम पंजाबी (तृतीय) यांना एज्युकेशन किट देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात रंगत आणणारा एक खास क्षण म्हणजे “ग्रेट भेट : अहिराणी शब्दांची जादू”.
अहिराणी मराठी कथाकार तथा ‘आयत पोयतं सख्यानं’ चे निर्माते, समाजभूषण प्रा. प्रवीण माळी यांनी आपल्या खास शैलीत अहिराणी भाषेतील लग्नरीती, गावागावातील बोलीभाषा आणि ग्रामीण संस्कृतीचे जिवंत चित्रण सादर केले. त्यांच्या विनोदी सादरीकरणाने संपूर्ण सभागृहात हास्याची उधळण झाली आणि श्रोते अक्षरशः पोट धरून हसले.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या अभिनेत्री अलकाताई कुबल यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दर्जेदार शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
त्या म्हणाल्या, “आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांकडे विविध भाषांवर प्रभुत्व असणे अत्यंत आवश्यक आहे. पोद्दार इंग्लिश स्कूलसारख्या संस्थेत शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार होऊ शकतात.”
यापुढे त्यांनी शाळेच्या निसर्गरम्य परिसराचे कौतुक करत पालकांना आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन केले.
या सोहळ्याला उद्योगपती सुनील झवर, सौ. मृणाल अमोल पाटील, सौ. शैलजा रणजित शिंदे, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, नगरसेविका जयश्री पाटील, तिलोत्तमाताई पाटील, सुलोचना वाघ, माधुरी पाटील, प्रा. प्रवीण माळी, रील स्टार चेतन कुमावत, प्रकाश वाघ आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या सर्व मान्यवरांचा सन्मान चेअरमन सौ. अर्चनाताई सूर्यवंशी व संचालक प्रशांत सूर्यवंशी यांनी वृक्ष देऊन केला. कार्यक्रमादरम्यान अलकाताई कुबल यांच्यासोबत फोटोसेशन करत अनेकांनी आठवणींना उजाळा दिला. सानेगुरुजी वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ यांनी त्यांच्या समवेत ईश्वर महाजन यांनी सिने अभिनेत्री अलका कुबल यांना वाचनीय पुस्तक भेट देऊन सत्कार केला.
निसर्गरम्य वातावरणात उभारलेली पोदार लर्न इंग्लिश स्कूल ही संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. महिलांचा मोठा सहभाग, मुलांचा उत्साह आणि संस्कारांचा संदेश यामुळे कार्यक्रमाला एक वेगळी उंची लाभली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चेअरमन सौ. अर्चनाताई सूर्यवंशी, संचालक प्रशांत सूर्यवंशी, प्रकाश वाघ, अभियंता निलेश वाघ, नीरज वाघ, अरुण सपकाळे यांनी परिश्रम घेतले, तर सरिता खाचणे मॅडम यांनी बहारदार सूत्रसंचालन केले.

शेवटी, हा कार्यक्रम केवळ स्पर्धांचा नव्हता, तर
संस्कारांची जपणूक, संस्कृतीची ओळख आणि भविष्याच्या दिशेने उचललेले प्रेरणादायी पाऊल ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *