वृत्तपत्रांना 150% दरवाढीसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे निवेदन; अमळनेर तहसीलदारांना सादर
![]()
वृत्तपत्रांना 150% दरवाढीसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे निवेदन; अमळनेर तहसीलदारांना सादर
अमळनेर प्रतिनिधी
राज्यातील वृत्तपत्र उद्योगाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडिया अमळनेरच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन सादर केले. हे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, माहिती व जनसंपर्क मंत्री तसेच मुख्य सचिव यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षांत कागद, प्रिंटिंग साहित्य, वीज, मनुष्यबळ यांसारख्या खर्चात सुमारे 150 टक्क्यांपर्यंत वाढ झाली असतानाही शासनाच्या जाहिरात दरांमध्ये वाढ न झाल्याने लघु व मध्यम वृत्तपत्रांवर आर्थिक संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर जाहिरात दरात 150% वाढ, ई-टेंडर जाहिराती संपूर्ण स्वरूपात प्रसिद्ध करणे, किमान जाहिरात आकार 200 चौ.से. निश्चित करणे, जाहिरात देयके 30 दिवसांत अदा करणे, तसेच लघु-मध्यम वृत्तपत्रांना समान संधी देणे अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या.
वरील निवेदन व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळे व त्यांच्या कोर कमिटीच्या मार्गदर्शनाखाली देशभर राबविण्यात येत असून, सर्व जिल्ह्यांमध्ये पदाधिकारी तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत आहेत. या उपक्रमाला संपूर्ण देशातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
तसेच पत्रकारांना अधिस्वीकृती, पेन्शन योजनांमध्ये सवलत, जाहिरात वाटपातील पारदर्शकता आणि माहिती खात्यामार्फतच सर्व जाहिराती देण्याची सक्ती, प्रलंबित तपासण्या व नैसर्गिक दरवाढ लागू करण्याची मागणीही यामध्ये करण्यात आली आहे.
यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. तालुका अध्यक्ष उमेश काटे यांनी तहसीलदारांना निवेदन वरिष्ठ स्तरावर तातडीने पाठविण्याची विनंती केली. तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवत त्या शासनस्तरावर पाठविण्याचे आश्वासन दिले.
तहसीलदारांना निवेदन व्हाईस आँफ मिडीयाचे राज्य सचिव व मार्गदर्शक डॉ दिगंबर महाले सर यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.
निवेदन देताना जिल्हा संघटक जयेशकुमार काटे, तालुका अध्यक्ष उमेश काटे, शहराध्यक्ष जयंतराव वानखेडे, प्रसिद्धीप्रमुख बापूराव ठाकरे यांच्यासह भरत पाटील, शरद कुलकर्णी, रजनीकांत पाटील, ईश्वर महाजन, निरंजन पेंढारे, दिनेश नाईक, दयाराम पाटील, चंद्रकांत निकुंभ, जगदीश पाटील, संजय पाटील, कमलेश वानखेडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


