“पुरोगामी महाराष्ट्र की अंधश्रद्धेचा विळखा? भोंदूगिरी, राजकीय आशीर्वाद आणि न्यायव्यवस्थेची कसोटी”
![]()
“पुरोगामी महाराष्ट्र की अंधश्रद्धेचा विळखा? भोंदूगिरी, राजकीय आशीर्वाद आणि न्यायव्यवस्थेची कसोटी”
महाराष्ट्र ही महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची भूमी. विवेक, समता, बंधुता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा वारसा लाभलेल्या या राज्याने देशाला प्रगतीची दिशा दिली. पण आजचा वास्तवाचा आरसा समोर ठेवला, तर हे पुरोगामित्व केवळ भाषणांपुरते आणि घोषणांपुरते मर्यादित राहिले आहे का, असा गंभीर प्रश्न निर्माण होतो.
अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात असतानाही राज्यात भोंदूगिरी, ढोंगीपणा आणि तथाकथित “महाराज” यांचे जाळे दिवसेंदिवस बळकट होत आहे. लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत, भीती आणि अज्ञान यावर आपले साम्राज्य उभे करणारे हे भोंदू लोक केवळ आर्थिक शोषण करत नाहीत, तर अनेकदा स्त्रियांच्या सन्मानावरही गदा आणणारे गंभीर गुन्हे करतात. अशोक खरातसारख्या प्रकरणांनी हे अधोरेखित केले आहे की, अंधश्रद्धेच्या आड किती भयानक आणि अमानवी कृत्ये लपलेली असू शकतात.
याहूनही धक्कादायक बाब म्हणजे अशा व्यक्तींना काही राजकीय घटकांचे थेट किंवा अप्रत्यक्ष आश्रय मिळाल्याच्या चर्चा सातत्याने समोर येतात. मतांच्या राजकारणासाठी विवेक गहाण ठेवून अशा प्रवृत्तींना खतपाणी घालणे, ही फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांची उघडपणे पायमल्ली आहे. जनतेचा विश्वास जिंकून सत्तेत पोहोचलेले लोक जर अशा अंधकारमय शक्तींना बळ देत असतील, तर समाजाचा मार्ग कोण दाखवणार?
अशा प्रकरणांमध्ये केवळ एका व्यक्तीवर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही. या मागील संपूर्ण साखळी उघडकीस आणणे गरजेचे आहे. कोणत्या राजकीय किंवा आर्थिक शक्तींनी पाठबळ दिले, किती लोक या जाळ्यात सामील होते, किती निरपराध लोकांची फसवणूक झाली — याचा सखोल आणि निष्पक्ष तपास झाला पाहिजे. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, तसेच अशा मार्गाने जमवलेली कोट्यवधींची संपत्ती शासनाने जप्त करून ती जनकल्याणासाठी वापरणे ही काळाची गरज आहे.
कायद्याच्या चौकटीत राहून कठोर शिक्षा देण्याची गरज आज अधिक तीव्रतेने जाणवते. कारण शिक्षा ही केवळ गुन्हेगाराला धडा शिकवण्यासाठी नसते, तर समाजात भीती निर्माण करून अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी असते. जर कायदे कमकुवत राहिले किंवा अंमलबजावणी ढिसाळ झाली, तर उद्या अशा अनेक “खरात” जन्माला येतील, यात शंका नाही.
तितकेच महत्त्वाचे म्हणजे समाजानेही स्वतःचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे आपणच नाही ना, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. विज्ञाननिष्ठ विचार, चिकित्सक वृत्ती आणि शिक्षणाचा प्रसार केल्याशिवाय अंधश्रद्धेचे निर्मूलन होणार नाही. “श्रद्धा” आणि “अंधश्रद्धा” यातील सूक्ष्म पण महत्त्वाचा फरक ओळखणे ही प्रत्येक सुजाण नागरिकाची जबाबदारी आहे.
आज गरज आहे ती केवळ संताप व्यक्त करण्याची नाही, तर ठाम भूमिका घेण्याची आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची, विवेकाची कास धरण्याची आणि खऱ्या अर्थाने पुरोगामी महाराष्ट्र घडवण्याची आहे.
कारण महाराष्ट्र फक्त नावाने नव्हे, तर विचारांनीही पुरोगामी असायला हवा.
— शब्दांकन : ईश्वर आर. महाजन
पत्रकार, अमळनेर
📞 98 6035 2960



