अमळनेरात भव्य हिंदू संमेलन उत्साहात संपन्न; पंच परिवर्तनाच्या संदेशातून समाजप्रबोधन
![]()
अमळनेरात भव्य हिंदू संमेलन उत्साहात संपन्न; पंच परिवर्तनाच्या संदेशातून समाजप्रबोधन
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात
श्रीमती इंदिरा गांधी विद्यालयात आयोजित करण्यात आलेले भव्य हिंदू संमेलन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. सामाजिक जागरूकता आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या संमेलनात प्रमुख वक्त्यांनी ‘पंच परिवर्तन’ या संकल्पनेवर सखोल प्रबोधन केले. यामध्ये सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वदेशीचा स्वीकार आणि नागरी कर्तव्य या पाच महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्राच्या श्रीमती विद्या दीदी तसेच शिवम कुटिया येथील माताजी या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. भुसावळ येथील इतिहास संशोधक श्री प्रवीणजी नायसे यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना विचारप्रवर्तक मार्गदर्शन केले. तर प्रमुख अतिथी नंदगाव येथील ईश्वरदास महाराज व कोळप्रिपीचे बालकनाथ जी महाराज होते.
सकल हिंदू समाज यांनी उत्कृष्ट आयोजन केले.हिंदू संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी परिसरातील नागरिकांची स्वागत समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या अध्यक्षपदी मराठा कॉलनी येथील श्री प्रशांत रंगराव शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला श्री स्वामी समर्थ मंदिर येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीसह मुख्य कार्यक्रमात परिसरातील हिंदू बंधू-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संमेलनात सांस्कृतिक कार्यक्रमांनीही रंगत आणली. नारायणी महिला मंडळाने सुमधुर धार्मिक गीतांचे सादरीकरण केले, तर चिरंजीव राजवीर चंद्रकांत कंखरे या बालकाने छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच ‘साई लहरी’ भजनी मंडळाने भावपूर्ण भजनांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख संत श्री बालकनाथ जी महाराज यांनी आशीर्वचन दिले.
या हिंदू संमेलनासाठी भोजन प्रसादाची व्यवस्था परिसरातील डॉक्टर बंधूंनी केली होती, तर इतर सर्व खर्च स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांनी उचलला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रवींद्र लष्करे सर यांनी केले. प्रास्ताविक श्री प्रशांत वंजारी सर यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन श्री यश राजेंद्र वर्मा यांनी केले.

