रमजान ईदनिमित्त मांडळ गावात बंधुभावाची उज्ज्वल परंपरा; सर्वधर्मीय एकतेचा आदर्श
![]()
रमजान ईदनिमित्त मांडळ गावात बंधुभावाची उज्ज्वल परंपरा; सर्वधर्मीय एकतेचा आदर्श
अमळनेर प्रतिनिधी
मुस्लिम धर्माचा पवित्र सण रमजान ईद निमित्त मांडळ गावात सर्व धर्मीय बांधवांनी एकत्र येत सलोखा, बंधुभाव आणि ऐक्याचा आदर्श घालून दिला. तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या गावात विविध जाती-धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहत असून प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची परंपरा जपली जाते.
मांडळ हे गाव धार्मिक व सांस्कृतिक वारशाने समृद्ध असून येथून जैन धर्मातील चार साध्वींचा उदय झाला आहे. महा सतीजी पदम प्रभाजी, महा सतीजी विद्येहाजी, महा सतीजी विरक्ताजी आणि महा सतीजी अनन्या श्रीजी या चारही संतांनी लहान वयातच देशसेवा व धर्मसेवेचा मार्ग स्वीकारत बालब्रह्मचारी दीक्षा घेतली आहे. त्यांच्या त्यागामुळे गावाचा नावलौकिक वाढला असून त्यांच्या प्रवचनातून शुद्ध आचार-विचार आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला जातो.
गावातील ग्रामदैवत विठ्ठल-रुक्माई मंदिराच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रमांना विशेष महत्त्व दिले जाते. हरिभक्त पारायण सप्ताह, कीर्तन सोहळे यामध्ये 80 ते 90 युवक टाळ-मृदंगाच्या तालावर सहभागी होत असल्याने गावात भक्तीमय वातावरण निर्माण होते. या कार्यक्रमांना महिला, ज्येष्ठ नागरिक यांचाही मोठा सहभाग असतो.
मांडळ गावात सर्व महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी एकत्र साजऱ्या केल्या जातात. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी वाल्मीकी, सावित्रीबाई फुले, जिजाऊ माता यांसह विविध समाजांच्या दैवतांचे उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतात. अलीकडेच पारधी समाजाच्या दि माताजी उत्सवाचा अकरा दिवसांचा सोहळा देखील उत्साहात पार पडला.
पाटील, मराठा, कोळी, जैन, नवबौद्ध, पारधी, भिल्ल, सुतार, धनगर, सोनार, पावरा आदिवासी आदी अठरापगड जातींचे नागरिक येथे एकोप्याने राहतात. शिक्षण, शेती, उद्योग, प्रशासन या विविध क्षेत्रात गावातील नागरिकांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून काही जण उच्च पदांवर कार्यरत आहेत. पिंपरी-चिंचवड येथील एमआयडीसीमध्ये गावातील सुपुत्र मोठा उद्योजक म्हणून कार्यरत असून त्यांचा वार्षिक उलाढाल सव्वाशे कोटींच्या पुढे आहे, ही गावासाठी अभिमानाची बाब आहे.
यावेळी माजी पंचायत समिती सभापती डॉ. दीपक पंढरीनाथ पाटील यांनी युवकांना आवाहन करताना सांगितले की, “धर्म-जातीच्या पलीकडे जाऊन शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार आणि विकासाच्या मुद्द्यांवर एकत्र काम करा. गावाची एकता हीच खरी ताकद आहे.”
रमजान ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा देत सर्वांनी देशाच्या प्रगतीसाठी व गावाच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.

