वादळी वाऱ्याचा अमळनेर तालुक्याला तडाखा; पिकांचे ७५% नुकसान, पंचनाम्याची मागणी ,  काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन; शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची अपेक्षा
1 min read

वादळी वाऱ्याचा अमळनेर तालुक्याला तडाखा; पिकांचे ७५% नुकसान, पंचनाम्याची मागणी , काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन; शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची अपेक्षा

Loading

वादळी वाऱ्याचा अमळनेर तालुक्याला तडाखा; पिकांचे ७५% नुकसान, पंचनाम्याची मागणी

काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन; शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची अपेक्षा

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर तालुक्यात दि. २० मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला असून, अनेक ठिकाणी ७५ टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांना निवेदन देऊन तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
दि. २० मार्च रोजी सकाळी १ ते ४ वाजेच्या दरम्यान जोरदार वादळी वारा वाहत होता. या नैसर्गिक आपत्तीमुळे मका, गहू, दादर, बाजरी, ज्वारी, हरभरा यांसह कांदा, टोमॅटो आणि आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः तालुक्याच्या पूर्व भागातील पातोंडा, नांदी, खवशी, पिंपळी, दहिवद, मठगव्हाण या परिसरात मका, दादर, ज्वारी व बाजरीची पिके पूर्णतः आडवी झाली असून ती पुन्हा उभी राहण्याची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
काही ठिकाणी कापणीस आलेल्या पिकांवरही परिणाम झाला असून, मका (म्हैस/महू) पिकावर पांढरा पडण्याची भीती निर्माण झाली आहे. हरभऱ्याचे घाटे जमिनीवर गळून पडल्याने उत्पादनात मोठी घट अपेक्षित आहे. या परिस्थितीत शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तालुक्यात सर्वच भागात कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले असले, तरी एकूण उत्पादनावर त्याचा गंभीर परिणाम होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतांचे पंचनामे करून त्यांना अनुदान स्वरूपात आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, सेवादल अध्यक्ष भागवत गुरुजी, प्रा. श्याम पवार, लोटन चौधरी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *