संसदेत जळगावच्या रेल्वे प्रश्नांची मांडणी; दुसऱ्याच दिवशी मंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा – खासदार स्मिताताई वाघ*
![]()
*संसदेत जळगावच्या रेल्वे प्रश्नांची मांडणी; दुसऱ्याच दिवशी मंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा – खासदार स्मिताताई वाघ*
अमळनेर प्रतिनिधी
जळगाव लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी खासदार स्मिताताई उदय वाघ यांनी लोकसभेत रेल्वे मंत्रालयाच्या २०२६-२७ च्या अनुदान मागण्यांवरील चर्चेत प्रभावी आणि ठोस मांडणी करत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. भाषणाच्या प्रारंभी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वे क्षेत्रात झालेल्या आमूलाग्र बदलांचे आभार व धन्यवाद मानले. २०१४ नंतर रेल्वे अधिक आधुनिक, सुरक्षित आणि गतिमान झाली असून महाराष्ट्राला रेल्वे प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. २००९-१४ च्या तुलनेत २०२६-२७ मध्ये राज्यासाठी निधीत लक्षणीय वाढ झाली असून १००% विद्युतीकरण, हजारो किलोमीटर नवीन रेल्वे मार्ग आणि ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत १३२ स्थानकांचा विकास ही उल्लेखनीय कामगिरी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
जळगाव मतदारसंघासाठी महत्त्वाचा असलेला उधना-जलगाव रेल्वे कॉरिडॉर (७,१०० कोटी रुपये) सध्या ८०% पूर्णत्वाकडे गेला असून जुलै २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकल्पामुळे मुंबई-भुसावळ-जलगाव मार्गावरील ताण कमी होऊन प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार आहे. तसेच या मार्गावर ‘कवच’ सुरक्षा प्रणाली लागू होत असल्यामुळे रेल्वे सुरक्षेत मोठी भर पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी लोकसभा क्षेत्रातील रेल्वे वेळापत्रकातील बदलांमुळे प्रवाशांना होत असलेल्या अडचणींचा मुद्दा ठामपणे मांडला. सूरत-भुसावळ एक्सप्रेस (१९००५) आणि देवलाली-भुसावळ एक्सप्रेस (११११३) या गाड्यांच्या वेळेत झालेल्या बदलांमुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि शेतकरी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. या गाड्यांचे वेळापत्रक तात्काळ पूर्ववत करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच उधना-पुणे दरम्यान थेट रेल्वे सेवा सुरू करण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी हजारो प्रवासी सध्या बस किंवा खासगी वाहनांचा पर्याय वापरत असल्याचे सांगितले. जळगाव स्थानकावर महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. कृषीप्रधान जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने रेल्वे लॉजिस्टिक्सचे महत्त्व स्पष्ट करत त्यांनी केळी, कापूस यांसारख्या उत्पादनांसाठी कोल्ड स्टोरेज, पार्सल व वेअरहाऊस सुविधा उभारण्याची गरज व्यक्त केली, जेणेकरून शेतकऱ्यांना मुंबई, दिल्ली आणि गुजरातच्या बाजारपेठांशी थेट जोडता येईल.
*दुसऱ्याच दिवशी मंत्र्यांची भेट; सकारात्मक संकेत*
लोकसभेतील चर्चेनंतर खासदार वाघ यांनी १७ मार्च रोजी नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या भेटीत उधना-पुणे एक्सप्रेस सुरू करणे हा प्रामुख्याने मुद्दा घेतला तसेच उधना-भुसावळ व देवलाली-भुसावळ पॅसेंजर गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली व पाचोरा येथे विदर्भ एक्सप्रेस आणि चाळीसगाव येथे कर्नाटक एक्सप्रेस ला थांबा देण्याची मागणी केली तसेच जळगाव, चाळीसगाव, पाचोरा, अमळनेर आणि धरणगांव परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, कर्मचारी व शेतकरी वर्गाला होत असलेल्या अडचणींची त्यांनी सविस्तर मांडणी केली. रेल्वेमंत्र्यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले असून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.

