नगर परिषद पारोळ्याचा आदर्श उपक्रम : विशेष मुलांसाठी ‘भत्त्यातून’ अन्नधान्य दान , मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या पुढाकारातून समाजाला प्रेरणा; परिश्रम मतिमंद निवासी शाळेला मदतीचा हात
![]()
नगर परिषद पारोळ्याचा आदर्श उपक्रम : विशेष मुलांसाठी ‘भत्त्यातून’ अन्नधान्य दान
मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या पुढाकारातून समाजाला प्रेरणा; परिश्रम मतिमंद निवासी शाळेला मदतीचा हात
अमळनेर प्रतिनिधी
सामाजिक बांधिलकीची जाणीव जपत पारोळा नगर परिषदेने एक प्रेरणादायी उपक्रम राबवला. नगर परिषद पारोळ्याचे मुख्याधिकारी मा. तुषार नेरकर यांनी वंजारी खुर्द (ता. पारोळा, जि. जळगाव) येथील चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित परिश्रम मतिमंद मुला-मुलींची निवासी शाळा येथे भेट देऊन विशेष मुलांसाठी अन्नधान्य किराणा स्वरूपात मदत केली.
या उपक्रमांतर्गत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व सदस्यांना मिळणाऱ्या बैठकीच्या भत्त्यातून सुमारे रु. 5800/- किंमतीचे अन्नधान्य शाळेला देण्यात आले. या उपक्रमामुळे समाजात संवेदनशीलतेचा आदर्श निर्माण झाला आहे.
यावेळी कार्यालय अधीक्षक यामिनी जटे मॅडम, लेखापाल महाजन साहेब, लेखापरीक्षक मोरस्कर साहेब, वरिष्ठ लिपिक किशोर चौधरी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी चंद्रकांत महाजन, पाणीपुरवठा विभागाचे संकेत पाटील, तसेच समुदाय संघटक कैलास पावसे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष डॉ. योगेश महाजन यांच्या वतीने मुख्याधिकारी तुषार नेरकर यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक मनीष जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. शाळेची सविस्तर माहिती उपमुख्याध्यापक हेमंत महाजन यांनी दिली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना तुषार नेरकर यांनी संस्थेचे अध्यक्ष डॉ. योगेश महाजन व सर्व कर्मचारी यांच्या कार्याचे कौतुक करत, अशा सामाजिक उपक्रमांना पुढेही पाठिंबा देण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पाटील सर यांनी केले. या उपक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

