जेष्ठ महिलांच्या सन्मानात महिला दिन उत्साहात साजरा  मराठी वाड्मय मंडळ व सावित्रीबाई फुले जेष्ठ महिला मंडळाचा संयुक्त उपक्रम; वसुंधरा लांडगे यांना सामाजिक कार्यासाठी सन्मान
1 min read

जेष्ठ महिलांच्या सन्मानात महिला दिन उत्साहात साजरा मराठी वाड्मय मंडळ व सावित्रीबाई फुले जेष्ठ महिला मंडळाचा संयुक्त उपक्रम; वसुंधरा लांडगे यांना सामाजिक कार्यासाठी सन्मान

Loading

जेष्ठ महिलांच्या सन्मानात महिला दिन उत्साहात साजरा

मराठी वाड्मय मंडळ व सावित्रीबाई फुले जेष्ठ महिला मंडळाचा संयुक्त उपक्रम; वसुंधरा लांडगे यांना सामाजिक कार्यासाठी सन्मान

अमळनेर प्रतिनिधी : मराठी वाड्मय मंडळ व सावित्रीबाई फुले जेष्ठ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. दिनांक १५ मार्च २०२६ रोजी नांदेडकर हॉल येथे आयोजित या कार्यक्रमात जेष्ठ महिलांच्या सन्मानासह विविध उपक्रमांनी उपस्थितांना प्रेरित केले.

कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून जळगाव येथील प्रख्यात डॉक्टर स्वाती परीक्षित बाविस्कर उपस्थित होत्या, तर प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. अनिता शिरीष चौधरी यांनी उपस्थिती लावली. त्यांच्या परिचयाचे कार्य सौ. सुरेखा बाविस्कर यांनी केले.
डॉ. बाविस्कर यांनी आपल्या प्रभावी भाषणातून जेष्ठ महिलांचे घरातील स्थान किती महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित केले. त्यांनी स्वतःच्या अनुभवातून सासूबाईंनी कोरोना काळात मुलांची जबाबदारी कशी सांभाळली, याचे उदाहरण देत जेष्ठांचे योगदान स्पष्ट केले. तसेच जेष्ठांनी आरोग्य, सौंदर्य व योग्य आहार याकडे विशेष लक्ष द्यावे, असे मार्गदर्शनही त्यांनी केले.
यावेळी सौ. सुनीताताई शिरीष चौधरी यांनीही महिलांशी संवाद साधताना जेष्ठ महिला या घराचा कणा असून त्यांच्या संस्कारामुळे कुटुंब सुदृढ राहते, असे मत व्यक्त केले. वयोमानानुसार त्यांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सौ. वसुंधरा लांडगे यांना सन्मानित करण्यात आले. मानपत्र, सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. त्यांच्या कार्याची ओळख प्रा. उषा पाटील यांनी करून दिली. मनोगत व्यक्त करताना सौ. लांडगे यांनी हा सन्मान मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत मंडळाचे आभार मानले.
अध्यक्षीय भाषणात सौ. कांचनताई शहा यांनी योग्य व्यक्तीला पुरस्कार दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच अमळनेर नगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेविका, खा.शि. मंडळाच्या उपाध्यक्षा श्रीमती माधुरी पाटील व कार्यकारिणी सदस्या सौ. लीना पाटील यांचा मोगऱ्याचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सौ. योगिता कापडणेकर, माधुरी पाटील व नगरसेविका कल्पना शर्मा यांनी मनोगत व्यक्त करत जेष्ठ नागरिकांना मदतीचे आश्वासन दिले.
कार्यक्रमात व्यसनमुक्ती विषयावर घोषवाक्य स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांक पल्लवी बागुल, अरुणा अलई व योगिता कापडणेकर यांनी पटकावला, तर उत्तेजनार्थ पुरस्कार भारती कोळी यांना मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात “खरा तो एकची धर्म” या प्रार्थनेने झाली. प्रास्ताविकात मंडळाच्या अध्यक्षा प्रा. शीला पाटील यांनी मराठी वाड्मय मंडळाची ओळख करून देत जेष्ठ महिला मंडळ स्थापन करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. फेस्कॉममार्फत जेष्ठांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय सवलतींची माहितीही त्यांनी दिली.

सौ. गायत्री भदाणे यांनी महिलांना शपथ दिली, तर रत्ना भदाणे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्रीमती स्नेहा एकतारे यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने झाला.

या यशस्वी आयोजनासाठी डॉ. प्रा. शैलजा माहेश्वरी, सौ. मंगला चव्हाण, सौ. छाया पाटील, सौ. सुदर्शना पाटील, सौ. आशा भदाणे, सौ. अलका गोसावी, सौ. सुनंदा चौधरी आदींचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास सावित्रीबाई फुले जेष्ठ महिला नागरिक संघ व मराठी वाड्मय मंडळाच्या महिला सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *