सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025” मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटर येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मान; दोन दशकांच्या प्रामाणिक पत्रकारितेची दखल
![]()
सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”
मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटर येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मान; दोन दशकांच्या प्रामाणिक पत्रकारितेची दखल
अमळनेर प्रतिनिधी :
दैनिक शब्दगंगा चे उपसंपादक पत्रकार ईश्वर रामदास महाजन यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय व सकारात्मक कार्याबद्दल प्रतिष्ठेचा “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील मंत्रालयासमोर असलेल्या यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट येथे पार पडलेल्या भव्य समारंभात मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
व्हॉईस ऑफ मीडिया (VOM) इंटरनॅशनल फोरम, आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “महाराष्ट्र भूषण सन्मान कार्य 2025” अंतर्गत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दि. 15 मार्च 2025, रविवार सायंकाळी 5.30 वाजता आयोजित या कार्यक्रमात राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. ना. ओमप्रकाश शेटे (अध्यक्ष, आयुष्यमान भारत मिशन, महाराष्ट्र शासन) होते. तर मा. ना. मंगलप्रसाद लोढा, मंत्री – कौशल्य विकास व उद्योजकता, महाराष्ट्र राज्य शासन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाला मा. महेंद्र कल्याणकर (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मा. महेश पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मुंबई, राणा सूर्यवंशी, उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते, तसेच चंद्रमोहन पुप्पाला, राष्ट्रीय सरचिटणीस, व्हॉईस ऑफ मीडिया यांची विशेष उपस्थिती होती. माध्यम क्षेत्रातील मान्यवरांमध्ये प्रसन्ना जोशी (संपादक – पुढारी मराठी वृत्तवाहिनी), विशाल पाटील (संपादक – लोकशाही मराठी वृत्तवाहिनी), विनोद तळेकर (संपादक – एनडीटीव्ही मराठी) आणि प्रसाद काथे (संपादक – जय महाराष्ट्र मराठी वृत्तवाहिनी) यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केले. यावेळी राज्याध्यक्ष अनिल म्हस्के, राज्य महासचिव दिव्या भोसले, राज्य सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले, तसेच राज्य कोर कमिटी मेंबर व नाशिक विभागीय अध्यक्ष कल्पेश महाले, राज्य प्रसिद्धी प्रमुख बापुराव ठाकरे यांनी पत्रकार ईश्वर महाजन यांच्या कार्याची दखल घेतली.
पुरस्कार स्वीकारताना पत्रकार ईश्वर महाजन यांच्यासोबत त्यांचे मित्र तसेच मुंदडा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. एस. विंचुरकर उपस्थित होते.
गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या ईश्वर महाजन यांनी प्रामाणिक, विधायक आणि सकारात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि प्रेरणादायी विषयांवरील बातम्यांमधून त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली असून त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी त्यांना आकर्षक स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या सन्मानाबद्दल व्हॉईस ऑफ मीडिया संघटना व उपस्थित मान्यवरांचे ईश्वर महाजन यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
दरम्यान, या सन्मानाबद्दल व्हॉईस ऑफ मीडिया अमळनेर तालुका अध्यक्ष उमेश काटे, सर्व पदाधिकारी व मित्रपरिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.

