जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत;* *तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन
1 min read

जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत;* *तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन

Loading

*जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत;*
*तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन*

जळगाव, दि. १३ — वर्षानुवर्षे विविध कारणांनी प्रलंबित राहणारे खटले, त्यातून होणारा आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तसेच आपसातील सामोपचाराने वाद मिटविण्यासाठी मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार देशभर एकाच दिवशी दि. १४ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांनी दिली आहे.

मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही लोक अदालत आयोजित करण्यात येत आहे. विधी सेवा प्राधिकरणव जिल्हा वकिल संघ, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने जळगाव येथे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. क्यू. एस. एम. शेख यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोक अदालती होणार आहे. या उपक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.), तसेच महानगरपालिका प्रशासन यांचे सहकार्य लाभणार आहे.

या लोक अदालतीमध्ये मोटार वाहन ट्रॅफिक चलन, भूसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक प्रकरणे, मोटार अपघात दावे, म्युनिसिपल अपील, दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच न्यायालयात प्रलंबित असलेली इतर तडजोडयोग्य खटले निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. तसेच खटला दाखलपूर्व प्रकरणांवरही सुनावणी होणार आहे.

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आपसांत तडजोडीसाठी संपूर्ण जिल्हयातुन मोठ्या प्रमाणावर खटले ठेवण्यात आलेले आहेत. तसेच या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये राष्ट्रीयकृत बँका, कंपन्या यांचे प्रलंबित असलेल्या दिवाणी व फौजदारी खटल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम वसुली होवुन मिळण्याची शक्यता आहे. वादपुर्व खटल्यामध्ये बँका, कंपन्या, भ्रमणध्वनी कंपन्या, दुरध्वनी कार्यालय, यांनी थकित रकमेमध्ये सुट देण्याबाबत प्रस्तावित केलेले आहे.

ज्या पक्षकारांना आपली प्रकरणे तडजोडीतून निकाली काढायची असतील त्यांनी संबंधित पक्षकार व त्यांचे वकील यांच्यासह उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा. तसेच ऐनवेळी तडजोडीने खटले निकाली काढण्यासाठी ठेवण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आली असल्याने नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *