ताडेपुरा–पैलाड नागरिकांचा पालिकेवर ढोल बजावो मोर्चा; अवमानकारक वक्तव्याचा निषेध, “नमो गार्डन ताडेपुरा येथेच होईल” – मुख्याधिकारी गणेश शिंदे यांची ग्वाही
![]()
ताडेपुरा–पैलाड नागरिकांचा पालिकेवर ढोल बजावो मोर्चा; अवमानकारक वक्तव्याचा निषेध
“नमो गार्डन ताडेपुरा येथेच होईल” – मुख्याधिकारी गणेश शिंदे यांची ग्वाही
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील नगरपरिषदे मार्फत शहरात १ कोटी रुपयांच्या निधीतून नमो गार्डन उभारण्याच्या विषयावर चर्चा करताना हा नाल्याचा परिसर आहे येथे दुर्गंधी येते अशी अवमानकारक भाषा सत्ताधारी गटाचे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी वापरल्याने ताडेपुरा व पैलाड परिसरातील नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढून जोरदार ढोल बजाओ आंदोलन केले. सदर आंदोलनामुळे सत्ताधारी गट कोंडीत सापडला होता,आंदोलकांचा संताप पाहुन स्वतः उपनगराध्यक्ष व नगराध्यक्ष यांनी मोर्चाला सामोरे जाणे टाळल्याने आंदोलक अधिकच संतापले होते,जोपर्यंत उपनगराध्यक्ष आमची जाहीर माफी मागणार नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्याने बराच वेळ आंदोलन सुरू होते.
दरम्यान आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने ताडेपुरा तलाव सुशोभीकरणासाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. याच ठिकाणी १ कोटींचे नमो गार्डन उभारावे जेणेकरून हा परिसर अजून सुशोभित होईल अशी मागणी शहर विकास आघाडीने केली होती. तर सत्ताधारी गटाने ही मागणी अमान्य करत हे काम दुसरीकडे शहरातील मध्यवर्ती भागात करावे अशी सूचना मांडली होती. त्यावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात वाद झाले होते. त्यातून उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी हे उद्यान ताडेपुरा येथे होणार नाही कारण ताडेपुरा तलाव नैसर्गिक पाण्याचा स्रोत नसून ते गटारीचे पाणी जमा झाले आहे असे चुकीचे वक्तव्य केले होते.याच वक्तव्याच्या निषेधार्थ ताडेपुरा परिसरातील नागरिकानी मोर्चा काढत हे आंदोलन केले.यावेळी सत्ताधारी गटातील नगरसेवक साहेबराव पवार व अनिल महाजन यांनी आंदोलकांशी चर्चा करत समजूत घातली तसेच त्या केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल आम्ही माफी मागतो मात्र आंदोलन मागे घ्या अशी विनंतीही केली.मात्र आंदोलकानी ज्यांनी ते चुकीचे वक्तव्य केले त्यानीच माफी मागावी अशी भूमिका घेतली. त्यानंतर मुख्याधिकारी यांच्या दालनात सर्व पोहोचून निवेदन सादर केले.
निवेदनाचा आशय पुढीलप्रमाणे–
शहराच्या विकासासाठी कोणतीही योजना स्वागतार्हच आहे; मात्र त्यानिमित्ताने शहरातील काही भागांना कमी लेखणे, तेथे नागरिक जाणार नाहीत असे सार्वजनिकपणे सांगणे आणि ताडेपुरा तलाव परिसराला गटारीचे पाणी साचलेला भाग म्हणून हिणवणे, हा त्या परिसरातील प्रत्येक नागरिकाचा उघड अपमान आहे.नागरिकांना दुय्यम दर्जाचे ठरविले आहे काय? ताडे तलावात गटारीचे पाणी साचते, असे जर खरे असेल तर त्याचे शुद्धीकरण व व्यवस्थापन करणे ही जबाबदारी नगरपरिषदेची नाही काय? एखादा भाग दुर्लक्षित ठेवायचा, सुविधा द्यायच्या नाहीत आणि नंतर त्यालाच अस्वच्छ म्हणून हिणवायचे ही भूमिका लोकशाही व्यवस्थेला शोभणारी नाही. सत्ताधारी मंडळी आमच्या दुर्लक्षित भागाला कमी लेखत असल्याने त्यांची भूमिकाच भेदभाव करणारी दिसत आहे अशा आशयाचे निवेदन पालिकेत देण्यात आले.
यावेळी मोर्चात नगरसेविका शोभाबाई भिवसन गढरे,नगरसेवक राजू फाफोरेकर,माजी नगरसेवक संजय कौतिक पाटील,दुर्गेश रवींद्र पाटील,अमर बालु पाटील,विशाल नारायण धनगर,हितेश अनिल पाटील,राकेश सुरेश पाटील,रोशन मुरलीधर पाटील,दिनेश आनंद कुंभार,दीपक ज्ञानेश्वर पाटील,निरज ज्ञानेश्वर पाटील, ललित कैलास पाटील,जयेश वाल्मिक पाटील,हर्षल पंडित पाटील,सतीश पुनमचंद पाटील,चेतन भरत पवार, चेतन रविंद्र पाटील,राज संजय कुंभार,राहुल रमेश गुरव,भूषण राजेंद्र लोहार, सूरज अभांगे, हेमंत देसले, भूषण दत्तू पाटील, अविनाश बोरसे, मुकेश प्रकाश पाटील, चतुर पाटील, गुलाब आधार पाटील, राहुल विजय पाटील, विशाल भरत पाटील यासह ताडेपुरा भागातील शेकडो महिला व नागरिक ढोल वाजवत सहभागी झाले होते.
नमो गार्डन ताडेपुरा येथेच होईल- मुख्याधिकारी
यावेळी आंदोलकांनी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांची भेट घेत चर्चा केली असता त्यांनी सांगितले की ताडेपुरा तलावाचे पाच कोटी रुपयांचे सुशोभीकरणाचे काम सुरूच आहे.तसेच नमो गार्डन हा स्वतंत्र विषय असून त्यासाठी लागणारी जागा देखील ताडेपुरा तलाव परिसरात असल्याने याचठिकाणी नमो गार्डन विकसित केले जाईल अशी ग्वाही मुख्याधिकारी शिंदे यांनी दिल्याने आंदोलकांचे समाधान होऊन ते माघारी फिरले.

