प्रताप महाविद्यालयात अँटी-रॅगिंग व विशाखा समितीमार्फत रॅगिंगविरोधी कायदे व POSH कायद्यावर मार्गदर्शन*
![]()
*प्रताप महाविद्यालयात अँटी-रॅगिंग व विशाखा समितीमार्फत रॅगिंगविरोधी कायदे व POSH कायद्यावर मार्गदर्शन*
अमळनेर प्रतिनिधी
प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथे अँटी-रॅगिंग समिती व विशाखा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी “रॅगिंगविरोधी कायदे” व “POSH (Prevention of Sexual Harassment) कायदा” या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंगविरोधी जागरूकता निर्माण करणे तसेच कार्यस्थळी व शैक्षणिक परिसरात लैंगिक छळ प्रतिबंधाबाबत माहिती देणे हा होता.
या कार्यक्रमात मान्यवर वक्त्या ऍडव्होकेट प्रणिता गांधलीकर यांनी रॅगिंगचे दुष्परिणाम, त्यावरील कायदेशीर तरतुदी आणि रॅगिंग रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनी घ्यावयाची जबाबदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच ऍडव्होकेट ज्योती बिऱ्हाडे यांनी POSH कायद्याच्या माध्यमातून कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या तरतुदी, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांनी पाळावयाचे आचारसंहितेबाबतही माहिती देण्यात आली.
या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना रॅगिंग व लैंगिक छळासंदर्भातील कायदे, त्यांचे परिणाम आणि सुरक्षित व सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचे महत्त्व समजले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव यांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले. सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी तसेच महिला दिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःला घडवावे व योग्य संधींचा उपयोग करून प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापिका व मोठ्या संख्येने विद्यार्थीनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अँटी-रॅगिंग समिती व विशाखा समितीच्या सदस्यांनी केले. तसेच युवती सभेच्या समन्वयक प्रा.डाॅ. वंदना भामरे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य व समिती प्रमुख डॉ. कल्पना पाटील यांनी तर सूत्रसंचालन डॉ नलिनी पाटील व आभार प्रदर्शन प्रा. वृषाली वाकडे यांनी केले .


