प्रताप महाविद्यालयात ‘स्किलफेस्ट 2026’ची दिमाखदार यशस्वी सांगता*
![]()
*प्रताप महाविद्यालयात ‘स्किलफेस्ट 2026’ची दिमाखदार यशस्वी सांगता*
—————————————–
● एआय, स्टार्टअप्स व शेअर बाजार सिम्युलेशनद्वारे १२० हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
अमळनेर : खान्देश शिक्षण मंडळ अंतर्गत कार्यरत व्यवस्थापन व तंत्रज्ञान संस्था यांच्या सहकार्याने प्रताप कॉलेज येथे १९ व २० जानेवारी २०२६ रोजी ‘स्किलफेस्ट 2026 – Developing Skills, Strategy & Spirit’ हा आंतरविभागीय शैक्षणिक महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. २२ जानेवारी रोजी पुज्य साने गुरुजी सभागृहात पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.
‘स्किलफेस्ट 2026’चा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये रोजगाराभिमुख कौशल्ये विकसित करणे, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) साधनांचा व्यावहारिक वापर शिकवणे, आर्थिक साक्षरता वाढवणे आणि व्यवस्थापन व तांत्रिक शाखांमधील समन्वय दृढ करणे हा होता. बीबीए, बीसीए, एमसीए, बीकॉम, एमकॉम तसेच इयत्ता ११ वी व १२ वीतील मिळून १२० हून अधिक विद्यार्थ्यांनी या महोत्सवात सक्रिय सहभाग घेतला.
महोत्सवाअंतर्गत ‘शार्क टँक स्टार्टअप स्पर्धा’मध्ये विद्यार्थ्यांनी एआय साधनांचा वापर करून अभिनव व्यावसायिक संकल्पना मांडल्या. ‘अॅड-मॅड डिजिटल शो’मध्ये दिलेल्या उत्पादनासाठी ६० सेकंदांची आकर्षक डिजिटल जाहिरात सादर करण्यात आली. ‘बुल ऑफ वॉल स्ट्रीट’ या शेअर बाजार सिम्युलेशन खेळातून विद्यार्थ्यांना बाजारातील चढ-उतारांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. तर ‘क्यूआर कोड ट्रेझर हंट’ स्पर्धेमुळे संघभावना, वेगवान निर्णयक्षमता आणि तांत्रिक कौशल्यांचा विकास झाला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून सादरीकरण कौशल्य, आर्थिक विश्लेषण, डिजिटल मार्केटिंग आणि तांत्रिक साक्षरता या बाबींमध्ये उल्लेखनीय प्रगती दिसून आली. पारितोषिक वितरण समारंभात विजेत्यांना प्रमाणपत्रे व आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
यावेळी कार्याध्यक्ष सीए नीरज अग्रवाल यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी व्यासपीठावर डॉ.हर्षवर्धन जाधव (प्रभारी प्राचार्य, प्रताप महाविद्यालय),प्रा.वर्षा पाठक (संचालिक, IMT), डॉ.तोरवणे योगेश (उपप्राचार्य, प्रताप महाविद्यालय) तसेच डॉ.किरण सुर्यवंशी (बीबीए विभागप्रमुख) उपस्थित होते. हा संपूर्ण कार्यक्रम बीबीए व बीसीए विभागातील प्राध्यापकांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला.
बीबीए व बीसीए अभ्यासक्रमांसाठी तंत्रशिक्षण संचालनालय मंडळातर्फे प्रवेश प्रक्रिया सुरू असून इच्छुक विद्यार्थ्यांना त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन अमळनेर येथील प्रताप महाविद्यालय परिसरातील IMT बिल्डिंगमध्ये दिले जात आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. तसेच बीबीए व बीसीए सीईटी नोंदणीची अंतिम तारीख १८ मार्च २०२६ पर्यंत वाढविण्यात आली असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विभागामार्फत अशा प्रकारचे कौशल्यवर्धक व उद्योगाभिमुख उपक्रम नियमितपणे आयोजित करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.

