वाचनामुळे वैचारिकता व संवेदनशीलता वाढून जीवनमूल्यांची अनुभूती येवून सामाजिक व राष्ट्रीय जबाबदारीची जाणीव निर्माण होते -वैष्णवी धनगर हिचे प्रतिपादन*
![]()
*वाचनामुळे वैचारिकता व संवेदनशीलता वाढून जीवनमूल्यांची अनुभूती येवून सामाजिक व राष्ट्रीय जबाबदारीची जाणीव निर्माण होते : वैष्णवी धनगर हिचे प्रतिपादन*
जळगांव विशेष प्रतिनिधी(विजय लुल्हे)
[ अमर संस्था संचलित पूज्य साने गुरुजी माध्यमिक विद्यालय वडती ( तालुका चोपडा ) माध्यमिक विद्यालयाने घेतलेले ” विद्यार्थी वाचक संमेलन ” ठरले चोपडा तालुक्यातील वाचन संस्कृती वाढीसाठीचे पहिले प्रेरणादायी संमेलन ]
” वाचनामुळे वैचारिकता व संवेदनशीलता वाढून जीवनमूल्यांची अनुभूती येऊन सामाजिक व राष्ट्रीय जबाबदारीचे जाणीव निर्माण होते ” असे प्रतिपादन प्रथम आंतरशालेय विद्यार्थी वाचक संमेलनाचे अध्यक्ष कु.वैष्णवी पंकज धनगर हिने केले. अमर संस्था चोपडा संचलित पूज्य साने गुरुजी माध्यमिक विद्यालय वडती तालुका चोपडा या शाळेत दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यार्थी वाचक संमेलन उत्साहात संपन्न झाले त्याप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना वैष्णवी धनगर विद्यार्थीनी बोलत होती.
संमेलनाच्या विचार पिठावर संमेलनाध्यक्ष विद्यार्थीनी वैष्णवी पंकज धनगर , मुख्याध्यापक संजय जोशी, विज्ञान शिक्षक अतुल चव्हाण , ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर महाजन ( अकुलखेडे ) ,ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार रमेश पाटील ( आडगाव ), अ.भा.साने गुरुजी कथामालेचे आजीव सभासद विजय लुल्हे ( जळगाव ) , पर्यावरण प्रेमी शरद पाटील ( अडावद ) , विजय पालीवाल, जगदिश पाठक , सायकलपटू समाधान धनगर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात ” खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे ” या साने गुरुजी लिखित प्रार्थनेचे साग्र संगीत समूह गायन झाले. ग्रंथ दिंडीचे अग्रपूजन मुख्याध्यापक संजय जोशी यांनी केले. ग्रंथपालखीत संतांच्या गाथा, पूज्य साने गुरुजींचे ‘ श्यामची आई ‘ तसेच ‘ भारतीय संस्कृती ‘ व अन्य प्रेरक ग्रंथसंपदा होती. ” वाचाल तर वाचाल ” ,” ग्रंथ आमचे सखे ; ग्रंथ आमचे सोबती ” अशा घोषणा देत वडती गावाच्या प्रमुख चौकात जाऊन ग्रंथ दिंडी विद्यालयात विसर्जीत झाली तेव्हा
विद्यार्थिनींनी शालेय प्रांगणात झिम्मा फुगडी खेळून लक्षवेधी समारोप केला.
संमेलनाच्या द्वितीय सत्रात कथा, कादंबरी व कविता संग्रह यावर आधारित वाचन स्पर्धा दि. २७ जानेवारी ते २७ फेबुवारी कालावधीत घेण्यात आली त्यात एकूण ४५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेत सर्वोत्तम गुण प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. आकर्षक ट्रॉफी , सन्मानपत्र आणि शाल या सत्काराने विद्यार्थी हरखून गेले ! तत्पूर्वी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर व डॉ.सी.व्हि. रमण यांच्या प्रतिमांचे पूजन संमेलनाध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथींचे स्वागत शाल, श्रीफळ व वाचनीय पुस्तके देऊन करण्यात आले.
………………………………
*विद्यार्थी वाचक संमेलन घेण्यामागील उद्दिष्ट्ये*
पूज्य साने गुरुजी, सिंधुताई सपकाळ यांच्या सामाजिक कार्याची ओळख व्हावी. ‘ बनगरवाडी ‘ व्यंकटेश माडगूळकर लिखित कादंबरी अन्वये धनगर समाजाची संस्कृती व लोक परंपरा ज्ञात होणे तसेच ‘ कोसला ‘ भालचंद्र नेमाडे लिखित कादंबरीतून ग्रामजीवन व सामाजिक अनुबंध समजणे. पर्यावरण जागृती होऊन जबाबदारीचे भान यावे, ऐतिहासिक पराक्रमाचा इतिहास समजून स्वराज्यप्रेम व स्वामिनिष्ठा जीवनमुल्ये समजणे, विज्ञाननिष्ठा संवर्धन होणे. साहित्य प्रकारांची ओळख होणे. वाचनाभिरूची वाढणे ; त्याअनुषंगे शालेय गुणवत्ता वर्धिष्णू होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे.
वाचनवेडा स्पर्धेसाठी उपलब्ध केलेली अन्य पुस्तके : – बहिणाबाईची गाणी , श्रीनिवास रामानुजन, एक होता कॉर्व्हर , स्वामी , बहिर्जी नाईक , मुसाफिर , आबा की कहानी, नदिष्ट , पाखरमाया , गुरुजी तू मला आवडला , इडली ऑर्किड आणि मी, डोंगरासाठी काही फुले इत्यादि
वाचनवेडा पुरस्कार प्राप्त विद्यार्थी* – *राज भिल ,धनंजय बाळू पाटील, साजिया पिंजारी, आफरीन पिंजारी, राहुल पाटील, मोहिनी कोळी, अनुष्का सोनवणे, प्रशांत कोळी,कल्याणी कोळी, अंजली धनगर ,घन:श्याम पाटील, पंकज धनगर, दुर्गेश्वरी पाटील, अश्विनी कैलास वाघ, किशोर पाटील, अश्विनी वासुदेव धनगर, वैष्णवी हिमांशू*
………………………………
मार्गदर्शनात संत साहित्याचे अभ्यासक प्रभाकर महाजन यांनी सदरहू उपक्रम विद्यार्थ्यांचे बौद्धिक पातळी उंचावणारा असून उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगून वाचक विद्यार्थी व संयोजक शिक्षकांचे जाहीर कौतुक केले. ज्येष्ठ साहित्यिक तथा पत्रकार रमेश पाटील मार्गदर्शनात म्हणाले की, ” मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला या मागील मुख्य प्रेरणा तात्यासाहेब वि .वा . शिरवाडकर यांची आहे.” डॉ.कलाम पुस्तक भिशीचे जिल्हाप्रमुख विजय लुल्हे मार्गदर्शनात म्हणाले की, ” विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो , पुस्तक वाचन हे साधन असून लेखनाभिव्यक्ती हे अंतिम साध्य माना.” ग्रंथ वाचन इतकेच माणसांचे वाचन करणे महत्वपूर्ण आहे हे सांगतांना त्यांनी पाळीव प्राण्यांचे माणूस वाचनाचे सोदाहरण दाखले दिले.

*संमेलनाची प्रेरक क्षणचित्रे*
🔰 विद्यार्थ्यांनी गावातील प्रमुख चौकातून काढली ग्रंथदिंडी ; वाचन संस्कृतीच्या वाढीसाठी घोषणा देऊन ग्रामस्थांचे वेधले लक्ष
🔰 ” वाचन वेडा ” पुरस्कारा अंतर्गत आकर्षक ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान
🔰 स्मृतिचिन्हे व पुरस्कारार्थी विद्यार्थ्यांना द्यावयाच्या दर्जेदार पुस्तकांसाठी भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी, जळगाव संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांचे आर्थिक योगदान
🔰 शाळा स्थापनेच्या २५ वर्षपूर्ती निमित्त शालेय ग्रंथालयाला साने गुरुजी लिखित ” दहा गोड गोष्टीचा संच ” व ” भारतीय संस्कृती ” ग्रंथ देण्याचा विजय लुल्हे यांनी केला जाहिर संकल्प
🔰 रिद्धी सोनार, शिवम गुरव, आशुतोष गुरव या विद्यार्थ्यांच्या बासरी वादनाने समारंभात चैतन्याचे वातावरण
🔰 प्रभाकर महाजन ( संचालक , नगर वाचन मंदिर चोपडा ) यांनी अनपेक्षित वाचक विद्यार्थ्यांना संबंधित पुस्तकांवर प्रश्न विचारून अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे बक्षिसे देऊन केले प्रोत्साहित
🔰 ग्रामीण भागात वाचन संस्कृती वाढीसाठी अभिनव उपक्रम आयोजित केल्याबद्दल संयोजक प्रशांत गुरव सरांचे प्रभाकर महाजन यांनी शाल, श्रीफळ देऊन केला हृद्य सत्कार
**********************
पर्यावरण प्रेमी शरद पाटील मार्गदर्शनात म्हणाले की ,” वाचनाभिरूची विकसित करतांना प्रदुषणाची जाणीव निर्मिती आणि पर्यावरण जागृतीचे भान देणारे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविण्याची नितांत गरज आहे.” उपस्थित श्रोत्यांमधून उत्स्फूर्तपणे विशाखा देशमुख या विद्यार्थिनीने उत्कृष्ट भाषण करून दाद मिळवली. मोहिनी कोळी, अनुष्का सोनवणे, अश्विनी धनगर या वाचक विद्यार्थीनींनी सुद्धा पुस्तक का आवडले ? या नुसार उत्स्फूर्त मनोगत दिले. विद्यार्थी वाचक संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विशाखा पाटील, रिद्धी सोनार, प्राजक्ता गुरव, आशुतोष गुरव, शिवम गुरव, घनःश्याम पाटील, साई कोळी, धनंजय पाटील या विद्यार्थ्यांनी अपार परिश्रम घेतले.संमेलनाच्या दरम्यान कु. रिद्धी सोनार, शिवम गुरव आणि आशुतोष गुरव यांचे सुश्राव्य बासरी वादनाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले. तसेच संमेलनाच्या अचूक कार्यवाहीसाठी अतुल चव्हाण, राजेश चौधरी, चेतन पाटील, जगदीश पाठक, अतुल धनगर , रवींद्र पाटील, विनोद धनगर, विजय पालीवाल, प्रशांत गुरव या शिक्षकवृदांनी अनमोल मार्गदर्शन केले. संमेलनाची भुमिका तथा प्रस्तावना अनुष्का सोनवणे व सुत्र संचालन मोहिनी कोळी या विद्यार्थीनीने केली. या अनोख्या संमेलनासाठी पुरस्कारार्थींचे माता / पिता पालक यांसह शिक्षणप्रेमी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.


