छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाअंतर्गत पाष्टे येथे समाधान शिबिर; पूर्वतयारीसाठी नियोजन बैठक संपन्न
1 min read

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाअंतर्गत पाष्टे येथे समाधान शिबिर; पूर्वतयारीसाठी नियोजन बैठक संपन्न

Loading

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाअंतर्गत पाष्टे येथे समाधान शिबिर; पूर्वतयारीसाठी नियोजन बैठक संपन्न

शिंदखेडा प्रतिनिधी :
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते मॅडम यांच्या आदेशानुसार व उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक साहेब यांच्या सूचनेनुसार तसेच शिंदखेडा तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ नरडाणा अंतर्गत मौजे पाष्टे येथे दिनांक १४ मार्च २०२६ रोजी “छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान” अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पूर्वतयारी व नियोजन बैठक ४ मार्च २०२६ रोजी दुपारी ४ वाजता पाष्टे येथे आयोजित करण्यात आली.

सदर बैठक मंडळ अधिकारी नरडाणा स्वाती वाघ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत महसूल विभागाच्या विविध योजना, नागरिकांना मिळणाऱ्या सेवा तसेच शिबिरादरम्यान दिल्या जाणाऱ्या दाखल्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांना महसूल विभागाच्या योजनांची माहिती देण्याबरोबरच शाळकरी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या विविध दाखल्यांच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेऊन त्यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला. कृषी विभाग, ॲग्री स्टॅक, पीएम किसान योजना, सामाजिक सर्वेक्षणातील लाभार्थी यांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. याशिवाय आरोग्य विभागाच्या सेवा, तपासणी व जनजागृती कार्यक्रमाबाबतही नियोजन करण्यात आले.

अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच महिला बचत गटांच्या प्रतिनिधींनी शिबिरासाठी आपापल्या स्तरावरील तयारी व नियोजनाची माहिती दिली. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळवून देण्याचा उद्देश असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

या बैठकीस पाष्टे गावचे सरपंच मोतीलाल वाकडे, मंडळ अधिकारी स्वाती वाघ, ग्राम महसूल अधिकारी प्रफुल मोरे, योगेश ठाकरे, मोनाली पवार, महेंद्र पाटील, रत्ना राजपूत, जितू सोनवणे, अमृत शिंदे, सुरेश कोळी, संपत आखाडे (कोतवाल), तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष लोटन पाटील, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष भुषण बोरसे, ग्रामसेवक डी. एन. पवार, सेतू केंद्र धारक जुबेर खाटीक यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य विभागाचे कर्मचारी, महिला बचत गटांच्या अध्यक्षा तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी १४ मार्च रोजी आयोजित समाधान शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपस्थित मान्यवरांकडून करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *