साडे पाच हजार पत्रकार आणि त्यांचे पंधरा हजार कुटुंबीय…! , ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ला ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ची साथ ,पत्रकार आणि पत्रकारितेला अधिक सजग बनवू : श्री श्री रविशंकर, देशातील सर्व राज्यात ‘पत्रकार मेडिटेट्स’ राबविणार: संदीप काळे
![]()
साडे पाच हजार पत्रकार आणि त्यांचे पंधरा हजार कुटुंबीय…!
‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ला ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ची साथ
पत्रकार आणि पत्रकारितेला अधिक सजग बनवू : श्री श्री रविशंकर
देशातील सर्व राज्यात ‘पत्रकार मेडिटेट्स’ राबविणार: संदीप काळे
मुंबई प्रतिनिधी: पत्रकारांच्या मानसिक आरोग्य आणि सकारात्मकतेसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम आणि ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ या विशेष ध्यान उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दहा दिवसांच्या उपक्रमात सुमारे साडे पाच हजार पत्रकार आणि त्यांच्या सुमारे पंधरा हजार कुटुंबीयांनी सहभाग नोंदवला, ही या उपक्रमाची मोठी वैशिष्ट्यपूर्ण बाब ठरली.
२३ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत दररोज सकाळी सात ते आठ या वेळेत हा ध्यान उपक्रम पार पडला. परमपूज्य श्री श्री रविशंकर गुरुदेव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’चे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सलील पुळेकर यांच्या नेतृत्वाखाली ही सत्रे घेण्यात आली.
या उपक्रमाच्या समारोपप्रसंगी श्री श्री रविशंकर यांनी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पदाधिकारी आणि पत्रकारांशी थेट संवाद साधला. पत्रकार सतत तणावाच्या वातावरणात काम करत असतात. त्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य टिकून राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ध्यान, श्वसन आणि सकारात्मक विचारांच्या माध्यमातून पत्रकार अधिक सजग, शांत आणि संतुलित होऊ शकतात, असे त्यांनी यावेळी सांगितले.
पत्रकार समाजातील घडामोडींचे भान जागृत ठेवणारे आणि लोकशाहीचे महत्त्वाचे स्तंभ आहेत. अशा वेळी पत्रकारांचे मन आणि विचार निरोगी राहणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम चे संस्थापक-अध्यक्ष संदीप काळे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता आगामी काळात हा उपक्रम देशातील सर्व राज्यांमध्ये राबविण्याचा मानस आहे. पत्रकारांचे मानसिक आरोग्य, सकारात्मकता आणि संतुलित विचारसरणी यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे आणि ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ यासाठी सातत्याने पुढाकार घेत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या ध्यान उपक्रमात राज्यातील अनेक मान्यवर संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि माध्यम क्षेत्रातील पदाधिकारी सहभागी झाले. पत्रकारांच्या मानसिक स्वास्थ्याबाबत जागरूकता निर्माण करणारा हा उपक्रम राज्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात राबविण्यात आल्याने पत्रकारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
पत्रकारांच्या आरोग्याला प्राधान्य देणारा हा उपक्रम राज्यात सकारात्मक परिवर्तनाची नांदी ठरला. व्हॉईस ऑफ मीडिया, व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम ची संपूर्ण टीमने याठी परिश्रम घेतले. तर द आर्ट ऑफ लिविंग यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य समन्वयक राहुल पाटील, बिपीन शिंगाडा, फिरोज खान, लक्ष्मण भंडारी, शायनी शेट्टी, सविता शर्मा , विनिता राय , लक्ष्मी शेखर, जिगन्यासा पंड्या, पद्मनाभ देशपांडे, राजश्री राणे, माणिक भोंग, मनीषा चंद्रा ही टीम परिश्रम घेतले आहे.
या उपक्रमाबद्दल सहभागी मान्यवरांच्या प्रतिक्रिया
श्रीकृष्ण चांडक (संस्थापक, संपादक महासागर मीडिया ग्रुप)
“पत्रकार हे सतत ताणाखाली काम करणारे योद्धे आहेत. त्यांच्या मानसिक संतुलनासाठी ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ हा उपक्रम अत्यंत आवश्यक आणि दूरदृष्टीचा ठरला आहे.”विशाल पाटील (संपादक, लोकशाही)
“बातम्यांच्या धावपळीत पत्रकार स्वतःकडे दुर्लक्ष करतात. या ध्यान उपक्रमामुळे पत्रकारांना अंतर्मनाशी संवाद साधण्याची संधी मिळाली.”तुळशीदास भोईटे (ज्येष्ठ पत्रकार व संपादक)
“पत्रकारितेच्या धावपळीत मनाला शांततेचा स्पर्श देणारा हा उपक्रम आहे. ध्यानामुळे पत्रकार अधिक सकारात्मक आणि संतुलित होऊ शकतात.”प्रसन्न जोशी (संपादक, पुढारी न्यूज टीव्ही)
“आजच्या वेगवान पत्रकारितेत मानसिक आरोग्य हा महत्त्वाचा विषय आहे. ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ हा उपक्रम पत्रकारांसाठी एक नवी ऊर्जा देणारा ठरला.”सरिता कौशिक (संपादक, एबीपी माझा)
“पत्रकार सतत तणावाच्या वातावरणात काम करतात. ध्यानासारख्या उपक्रमामुळे त्यांना मानसिक स्थैर्य आणि नव्या उर्जेची अनुभूती मिळते.”धर्मराज हल्लाळे (संपादक, लोकमत)
“व्हॉईस ऑफ मीडियाने पत्रकारांच्या आरोग्याचा विचार करून घेतलेली ही पुढाकार अत्यंत अभिनंदनीय आहे. हा उपक्रम पुढेही सातत्याने व्हावा.”रविकिरण देशमुख (समूह राजकीय संपादक, फ्री प्रेस जर्नल व नवशक्ती)
“पत्रकारांचे मानसिक आरोग्य जपणे ही काळाची गरज आहे. या ध्यान उपक्रमामुळे पत्रकार अधिक सजग, शांत आणि सकारात्मक होतील.”रवींद्र आंबेकर (संपादक, मॅक्स महाराष्ट्र)
“पत्रकारितेतील धकाधकीत मन शांत ठेवण्याचा हा प्रभावी मार्ग आहे. ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ उपक्रम पत्रकारांना नवी दिशा देणारा आहे.”अशोक वानखडे (ज्येष्ठ पत्रकार)
“ध्यानामुळे मनाला स्थैर्य मिळते आणि विचारांना स्पष्टता मिळते. पत्रकारांसाठी हा उपक्रम खरोखरच प्रेरणादायी ठरला.”विश्वास देवकर (ज्येष्ठ पत्रकार)
“दहा दिवस चाललेला हा ध्यान उपक्रम पत्रकारांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारा ठरला. अशा उपक्रमांमुळे पत्रकार अधिक सक्षम आणि शांत मनाने काम करू शकतात.”

