अहिराणी भाषेतील गोडवा जपणार “जानकी नं लगीन” सुभाष अहिरे लिखित अस्सल अहिराणी भाषेतील एकांकिका संग्रह …!
1 min read

अहिराणी भाषेतील गोडवा जपणार “जानकी नं लगीन” सुभाष अहिरे लिखित अस्सल अहिराणी भाषेतील एकांकिका संग्रह …!

Loading

अहिराणी भाषेतील गोडवा जपणार “जानकी नं लगीन” सुभाष अहिरे लिखित अस्सल अहिराणी भाषेतील एकांकिका संग्रह …!

खानदेशात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असलेलं साहित्य विश्वातील नाव म्हणजे सुभाष अहिरे नाना यांचं “जानकीनं लगीन” हा अहिराणी भाषेतील एकांकिका संग्रह चेतक बुक, पुणे यांनी प्रकाशित केला आहे. या 114 पेजेसच्या एकांकिका संग्रहात अनुक्रमे, जानकी नं लगीन ,आहेर ,चटका अशा तीन अस्सल अहिराणी बोलीतील एकांकिका प्रकाशित करण्यात आल्या आहेत. विशेषता “जानकीनं लगीन” ही एकांकिका रंगमंचावर सुद्धा सादरीकरण झालेली एकांकिका असून या एकांकिकेच्या नावाने चित्रपट निर्मिती सुद्धा झालेली आहे. या एकांकिके चे प्रयोग छत्रपती शिवाजी नाट्य मंडळ, धुळे या नाट्य ग्रुपने सादर केलेले आहेत.
तसं म्हटलं तर” जानकीनं लगीन “हा आपला खानदेशातील बोली भाषेतील अहिराणी एकांकिका संग्रह असला तरी ही एकांकिका बालविवाह या विचार धारेवर आधारित असून, बालविवाह ही समस्या आजच्या आधुनिक काळात सुद्धा बंद झालेली नाही. याचे दुष्परिणाम काय असतात ?याची जाण समाज माध्यमाला अज्ञानापोटी अजून आलेली नाही. खरंतर हे दुर्दैव आहे. बालविवाह ही समस्या खानदेशात नाहीतर संपूर्ण भारतात आहे.आपल्या समाज व्यवस्थेची मानसिकता अशी असते की, मुलगी घरात असली म्हणजे ती मोठ्या प्रेमाने लाडाने वाढवली जाते परंतु 14- 15 वर्षाची झाल्याबरोबर आई-वडिलांना तिच्या लग्नाची चिंता पडते. आपण लग्न करून कधी मोकळे होतो.. अशाच भावनेने तिचे बाल विश्व उद्ध्वस्त केले जाऊन तिचे अल्लाड बालपण ,तिची शिक्षणाची तळमळ तिच्या आशा आकांक्षा सर्व पायदळी तुडवून तिला विवाहाच्या बंधनात अडकवण्या त येते .या प्रश्नावर वाचा फोडणारी एक अत्यंत उत्कृष्ट अशी ही एकांकिका असून यातील जानकी ही अत्यंत खोडकर, अल्लड, निरागस तसेच नव विचारांची प्रेरणा देणार एक पात्र रंगविण्यात आले असून सुभाष अहिरे यांनी या पात्राला खूप न्याय दिल्याचे जाणवते. प्रत्येक्ष जीवनात सुद्धा असाच न्याय आपल्या माया बहिणींना मिळाला पाहिजे परंतु तसे घडताना दिसत नाही. त्यामुळेच काळाच्या ओघात अशा प्रकारच्या एकांकिका समाजप्रबोधनासाठी खूपच आवश्यक असतात आणि अशा एकांकिके चे प्रयोग हे गावागावात झाले पाहिजे . त्या दृष्टीने ही एकांकिका पुस्तक रूपाने प्रकाशित झाली हे खूपच आनंददायी आणि मनाला समाधान देणारी गोष्ट आहे .
त्यानंतर खानदेशातील लग्नविधी मध्ये आणखी एक परंपरा आहे. फार पूर्वीच्या काळी म्हणजे साधारण 30-40 वर्षांपूर्वी लग्नात “आहेर” देण्याची एक प्रथा असायची .त्या प्रथा वर आधारित “आहेर” नावाची एकांकिका येथे प्रकाशित करण्यात आले आहे. खानदेशात काळाच्या ओघात लुप्त होत असलेल्या काही चांगल्या परंपरा, प्रथा त्याचे सादरीकरण प्रत्येक्ष रंगमंचावर निवेदनाच्या माध्यमातून येथे सादर करण्यात आले असून शेवटी ‘जुने ते सोनेच’ असते .हे ही एकांकिका वाचल्यानंतर जाणवते. खानदेशी ग्राम जीवनातील विवाह सोहळ्यातील वेगवेगळ्या होणाऱ्या विधी ,काळा नुसार बदल होत गेला. सध्याच्या गतिमान जगात वेळ काळाचे भान आल्यामुळे चांगल्या प्रथा जाऊन नको त्या खर्चिक गोष्टी, दिखावा , लग्न सोहळा म्हणजे जास्तीत जास्त खर्च करून, नको त्या फोटोसेशन ला महत्त्व देऊन वेळ काळाचे बंधन नसलेलं असं नकोसं वाटलेलं हा सोहळा झाल्याचे जाणवते. लग्न हे एक कर्जबाजारी होण्याचे माध्यम खानदेशाच्या बोकांडी बसलं असं वाटतं.. !
तरी फार पूर्वीच्या काळी ह्या विधी कशा योग्य होत्या? त्या कशा बिना खर्चिक होत्या आणि किती पवित्र होत्या. हे प्रत्येक्ष ही एकांकिका वाचल्यानंतर आपल्याला जाणवते. यातील लोकगीते, बोली भाषेतील मौखिक गीते, म्हणी, आहणे सर्व काही ऐकायला मोठे गोड वाटते.
बोली भाषेतील काही गीत काही म्हणी या सर्व गोष्टी ह्या एकांकिका मध्ये सादर करण्यात आलेल्या आहेत .आणि त्या दृष्टीने “आहेर “ही एकांकिका आपल्या डोळ्यासमोर एखादा लग्नविधी प्रत्येक्ष स्वरूपात होतोय असं आभास निर्माण करते.
यातील तिसरी एकांकिका “चटका” नावाची अहिराणी एकांकिका असून खानदेशी ग्राम जीवनात शेती, माती, माणूस , त्याचं माणूसपण, त्याचे रागीट पण, त्याची गरीबी ,त्याचे अज्ञान, त्याची दुर्दशा याचे अत्यंत ज्वलंत असे सादरीकरण “चटका “या एकांकिकेत करण्यात आले असून भट्या हे यातील मुख्य पात्र तेल घेण्यासाठी गेलेला असतो. त्याचा रुपया त्याला सापडत नाही. तेव्हा तो श्रीमंताच्या वट्या वरील पणत्यां मधील तेल स्वतःच्या बाटलीत ओतून घेतो. श्रीमंताच्या घरातील पणत्या असल्यामुळे कोणी पाहणार नाही’.. “बडे घर मे है कोन देखेगा..?” अक्कल बडी का भैस बडी ..?”असं म्हणून त्याच्या सहकारी शब्बीर त्या पणतीतलं तेल बाटलीत ओतायला लावतो .चोरी पकडली जाते. आणि अशा वेळेला गरिबी विरुद्ध श्रीमंती,विकृत समाजाचं प्रति रूप भगीरथा भट्याच्या हातावर तापलेले खुरप ठेवते. कोवळ्या वयातला भट्या किंचाळतो. वेदनेने हळहळतो. तो ओरडतो. आई शांताई त्याला बिलगते. पोटाशी घेते. पोरांचा गलका होतो. सर्वत्र गोंधळ उडतो .श्रीमंताच्या पणतीत तेल जळतं पण गरिबाच्या कढईत फोडणीला तेल मिळत नसतं.. हे दाहक सत्य या एकांकिका द्वारे येथे प्रगट करण्यात आले आहे.
गरीबा च्या लहान मुलाच्या हातावर चटका ठेवणे ही भयानक शिक्षा आहे .गुरुजी येतात .ही शिक्षा सहन करण्याजोगे नाही. कोट्यावधी रुपयाचे तेल जाळणाऱ्या समाजाला गरिबाच्या भाजीतले तेल कसे दिसणार..? आपण भट्या वर अन्याय होऊ देणार नाही .अशा प्रकारच्या संदेश गुरुजी देतात .
-आणि सर्व एकत्र येतात. श्रीमंत आणि गरिबी यातली दरी दाखवून देत असताना अन्यायाला वाचा फोडली पाहिजे असा संदेश या “चटका” एकांकिके द्वारे दिला जातो.
एकंदरीत सुभाष अहिरे हे नाव साहित्यिक क्षेत्रात जसे कथा कथनकार म्हणून प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे ते उत्कृष्ट एकांकिका ,उत्कृष्ट नाटकार म्हणून नावारूपाला आले आहेत .त्यांचे “जानकीने लगीन” या अहिराणी एकांकिका संग्रहाचे पुस्तक स्वरूपात प्रकाशित केले आहे. वाचकांना अहिराणी भाषेतील गोडवा जाणवणारं असे हे अस्सल अहिराणी बोलीतील पुस्तक आवडेल यात शंका नाही.. !

शब्दाकंन

गोकुळ बागूल
२१, टेलिफोन कॉलनी,
अमळनेर, जि.जळगाव.
मो.९४२२२७६२४०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *