खान्देशात विद्रोही विचारांची हाक : शाहीर संभाजी भगत यांचा अमळनेरात सत्कार व संवाद , ९ मार्च २०२६ रोजी मराठी वाड्मंडळ नांदेडकर सभागृहात कार्यक्रम
![]()
खान्देशात विद्रोही विचारांची हाक : शाहीर संभाजी भगत यांचा अमळनेरात सत्कार व संवाद
९ मार्च २०२६ रोजी मराठी वाड्मंडळ नांदेडकर सभागृहात कार्यक्रम
अमळनेर प्रतिनिधी
विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले १५ वे विद्रोही साहित्य संमेलन येत्या २ व ३ मे २०२६ रोजी सातारा येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर संमेलनाध्यक्ष तथा प्रख्यात शाहीर संभाजी भगत खान्देश दौऱ्यावर येत असून, सोमवार दि. ९ मार्च २०२६ रोजी ते अमळनेर येथे भेट देणार आहेत.
समाजातील अन्याय, विषमता आणि असमानतेविरुद्ध आपल्या जाज्वल्य वाणीने आवाज उठवणारे शाहीर संभाजी भगत हे परिवर्तनवादी विचारांचे सशक्त प्रतिनिधी मानले जातात. त्यांच्या उपस्थितीत अमळनेर येथे सकाळी ११ वाजता मराठी वाड्मंडळ नांदेडकर सभागृहात सत्कार व मुक्त संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या दौऱ्यादरम्यान शाहीर भगत साने गुरुजी कर्मभूमी स्मारक परिसरास भेट देणार असून, साने गुरुजींच्या मानवतावादी, समानतावादी आणि संविधाननिष्ठ विचारांना अभिवादन करणार आहेत. अमळनेर ही साने गुरुजींची कर्मभूमी असल्याने या भेटीला विशेष ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
अमळनेर परिसरातील समानता, मानवता, अहिंसा आणि भारतीय संविधानाच्या मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक संस्था, संघटना तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या वतीने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात विद्रोही साहित्य चळवळीचे उद्दिष्ट, सामाजिक परिवर्तनातील साहित्याची भूमिका आणि वर्तमान काळातील सांस्कृतिक आव्हाने यावर शाहीर संभाजी भगत मुक्त संवाद साधणार आहेत.
साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर व साने गुरुजी विद्यालय, अमळनेर यांच्या वतीने अमळनेर व परिसरातील नागरिक, साहित्यप्रेमी, तरुणाई आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम केवळ सत्कारापुरता मर्यादित नसून सामाजिक जाणीव, विचारप्रबोधन आणि परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

