एक गाव, एक होळी” : भडणे गावात एकतेचा तेजोमय उत्सव
![]()
“एक गाव, एक होळी” : भडणे गावात एकतेचा तेजोमय उत्सव
शिंदखेडा प्रतिनिधी
शिंदखेडा तालुक्यातील भडणे हे गाव राजकीय क्षेत्रात जसे अग्रेसर आहे, तसेच धार्मिक आणि सामाजिक परंपरांमध्येही जिल्हाभरात आपली वेगळी ओळख जपून आहे. “एक गाव, एक होळी” ही अनोखी परंपरा भडणेकरांनी वर्षानुवर्षे जतन केली असून, आजही ती तेवढ्याच उत्साहात आणि एकात्मतेने साजरी केली जाते.
फाल्गुन पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला गावातील भगवा चौकात संपूर्ण गावकरी सायंकाळी एकत्र येतात. चौकाच्या मध्यभागी उभारली जाणारी होळी ही गावाच्या ऐक्याचे प्रतीक ठरते. विशेष म्हणजे, गावातील लोहार बंधू – एकनाथ (नाना) मुरलीधर लोहार – सेमीच्या लाकडाची होळी कोणताही मोबदला न घेता तयार करून देतात. आपल्या वडिलांपासून चालत आलेली ही परंपरा ते आजही तितक्याच निष्ठेने जपत आहेत.
याचबरोबर गावातील सतीश मालचे, नाना गायकवाड, संदीप गायकवाड, राजू गायकवाड आणि हिलाल गायकवाड हे मातंग समाजातील नागरिक होळीसाठी लागणारे सेमीचे लाकूड व सरपण स्वखर्चाने आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता गोळा करतात. ते घरोघरी जाऊन लाकूड व सरपण जमा करून चौकात आणतात. गावातील लहान मुलेही उत्साहाने यात सहभागी होत लाकूड गोळा करतात, ज्यामुळे सणामध्ये सर्व वयोगटांचा सहभाग दिसून येतो.
होळीच्या पूजेचा संपूर्ण खर्च ग्रामपंचायतीमार्फत दरवर्षी केला जातो. ग्रामपंचायत क्लार्क खुशाल पाटील यांचीही यात विशेष मदत असते. सायंकाळी सात वाजता गावकरी एकत्र जमल्यानंतर पोलीस पाटील युवराज माळी आणि पुरोहित राजू कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्रोच्चारात पारंपरिक पद्धतीने होळीची पूजा केली जाते. होळी पेटवण्याचा मान पोलीस पाटलांना दिला जातो, हीही गावातील सन्मानाची परंपरा आहे.
यावेळी गावातील आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. होळीभोवती प्रदक्षिणा घालून नैवेद्य अर्पण केला जातो आणि त्यानंतर सर्वजण आनंदाने घरी परततात.
भडणे गावातील “एक गाव, एक होळी” ही परंपरा केवळ धार्मिक विधी नसून, सामाजिक ऐक्य आणि जातीय सलोख्याचा संदेश देणारा उत्सव आहे. ग्रामीण भागात आजही एकात्मतेची ज्योत प्रज्वलित ठेवणाऱ्या भडणेकरांचे हे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे.

