एक विचार, एक होळी” : राधाकृष्ण नगरीत एकात्मतेचा संदेश देणारा उत्सव
![]()
“एक विचार, एक होळी” : राधाकृष्ण नगरीत एकात्मतेचा संदेश देणारा उत्सव
संभाजीनगर प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर येथील राधाकृष्ण नगरी, तिसगाव वसाहतीमध्ये यावर्षी होळीचा सण “एक विचार, एक होळी” या अभिनव संकल्पनेतून उत्साहात आणि एकात्मतेच्या वातावरणात साजरा करण्यात आला. समाजात एकोपा वाढावा, दुष्ट प्रवृत्ती, पाप आणि असत्याचा त्याग व्हावा तसेच चांगुलपणा आणि सत्याचा विजय व्हावा, हा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
होळीच्या पवित्र दिवशी राधाकृष्ण नगरीतील महिला, पुरुष आणि लहान मुले मोठ्या संख्येने एकत्र जमले. सर्वांच्या उपस्थितीत विधीवत पूजा करून पारंपरिक पद्धतीने होळी प्रज्वलित करण्यात आली. परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
या कार्यक्रमासाठी मोहनसिंग भैया सलामपुरे यांच्या समवेत रामसिंग सलामपुरे, भरतसिंग सलामपुरे, अमृतसिंग सलामपुरे, मोहन गिते, आण्णासाहेब गफाट, मुरलीधर बेडगे, उमाकांत घाळे महाराज, सोनटक्के साहेब, धर्माधिकारी साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भरतसिंग सलामपुरे सर यांनी होळी सणाचा इतिहास, हिंदू धर्मातील या परंपरेची सुरुवात आणि त्यामागील धार्मिक व सामाजिक महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी होळी हा सण सत्याचा असत्यावर आणि चांगुलपणाचा वाईटावर विजय दर्शवणारा असल्याचे सांगितले. भक्त प्रल्हादाच्या अढळ श्रद्धेमुळे होलिकेचा पराभव झाला, ही कथा सांगत त्यांनी उपस्थितांना वाईट विचारांचा त्याग करून सद्विचार स्वीकारण्याचे आवाहन केले.
“एकच होळी” या संकल्पनेतून राधाकृष्ण नगरीतील नागरिकांनी समाजातील एकात्मता, बंधुभाव आणि सद्भावनेचा आदर्श निर्माण केला आहे. सामूहिक सहभागातून साजरा झालेला हा उत्सव सामाजिक ऐक्याची ज्योत अधिक प्रखर करणारा ठरला असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

