व्यसनमुक्तीचा संदेश देणारी महिलांची सशक्त हाक ! सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळातर्फे घोषवाक्य स्पर्धा उत्साहात
![]()
व्यसनमुक्तीचा संदेश देणारी महिलांची सशक्त हाक !
सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळातर्फे घोषवाक्य स्पर्धा उत्साहात
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर नगरीत सामाजिक जागृतीचा नवा अध्याय लिहित सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळामार्फत फक्त महिलांसाठी व्यसनमुक्ती विषयावर घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. क्रांतीपर्व स्मारक, ढेकू रोड येथे पार पडलेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मराठी व हिंदी या दोन्ही भाषांमध्ये व्यसनमुक्तीवर प्रभावी, समाजप्रबोधन करणारी घोषवाक्ये लेखी स्वरूपात लिहून घेण्यात आली. महिलांनी अत्यंत संवेदनशीलतेने आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून प्रभावी घोषवाक्ये सादर केली.
स्पर्धेच्या प्रारंभी मंडळाच्या अध्यक्षा प्रा. शीला पाटील, उपाध्यक्षा डॉ. प्रा. शैलजा माहेश्वरी, सचिव सौ. गायत्री भदाणे, खजिनदार प्रा. उषा पाटील तसेच इतर कार्यकारिणी सदस्य आणि स्पर्धक महिलांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
या स्पर्धेत एकूण २५ महिलांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक स्पर्धकाने व्यसनमुक्तीचा ठाम संदेश देत समाजाला सकारात्मक दिशा देणारी घोषवाक्ये मांडली. महिलांच्या लेखणीतून व्यक्त झालेली सामाजिक जाणीव आणि परिवर्तनाची हाक ही या उपक्रमाची विशेष जमेची बाजू ठरली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. महिलांच्या सहभागातून व्यसनमुक्त समाजाची उभारणी करण्याचा निर्धार या उपक्रमातून दृढ झाल्याचे समाधान मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
अशा विधायक उपक्रमांमुळे अमळनेर नगरीत सामाजिक परिवर्तनाचा दीप अधिक तेजाने प्रज्वलित होत असल्याचे चित्र या स्पर्धेतून दिसून आले.

