डॉ. एल. ए. पाटील लिखित ‘रघा’ : शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरुद्धची दाहक संघर्षगाथा
![]()
डॉ. एल. ए. पाटील लिखित ‘रघा’ : शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरुद्धची दाहक संघर्षगाथा
अमळनेर प्रतिनिधी
“रघा “ही डॉ एल ऐ पाटील यांची कादंबरी पुणे येथील” पद्म गंधा प्रकाशन” यांनी प्रकाशित केली असून पुस्तकाचे मुखपृष्ठ अन्वर हुसेन यांनी साकारले आहे. पुस्तकाची किंमत रुपये 380 असून हे जवळजवळ 248 पेजेस चे पुस्तक झाले आहे .ही कादंबरी शैक्षणिक क्षेत्रातल्या भ्रष्टाचार करणारे भ्रष्ट संचालक मंडळ आणि स्वतःच्या हापापलेल्या स्वार्थी वृत्तीने’ हम करे सो कायदा’ पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रा सारख्या पवित्र कार्याचा बळी देणाऱ्या कृती विरुद्ध हा मोठा संघर्ष लढा डॉ.एल ऐ पाटील सरांनी या कादंबरीत “रघा” या व्यक्ती चित्रन द्वारे प्रस्तुत केला आहे. प्रत्यक्ष त्या पदावर असताना नैतिकता, पदाची शिस्त, पदाची प्रतिमा आपण ज्या शैक्षणिक संस्थेत काम करतो त्याच्या सुवर्ण युगाची आठवण करून देणारी अशी ती शैक्षणिक संस्था आणि तिला वाळवी लावणारे, तिला नष्ट करणारे, नतदृष्ट, भ्रष्ट संचालक मंडळ, त्याचा अनैतिक मार्गाने निवडून येणारा अध्यक्ष, असा हा संघर्ष रंगविण्यात आला असून विशेष म्हणजे या संघर्षात खरंतर ” जिंकणं” खूप कठीण असून सुद्धा यातला” रघा” हा संघर्ष आपल्या नैतिक आणि संस्कारी जीवनाचा भाग समजून, या लढ्याला समर्थपणे तोंड देत असताना,
” जिथे सत्य असतं तिथे सर्वसामान्य समाज सत्याच्या बाजूने उभा राहतो. नुसता उभा जात नाही तर लढा देण्यासाठी प्रेरक प्रेरणा सुद्धा देत देतो.”
याचे ज्वलंत उदाहरण या द्वारे इथे प्रगट झाल्याचे जाणवते.
समाज व्यवस्थेमध्ये शैक्षणिक क्षेत्रा सारख्या पवित्र क्षेत्रात अशा प्रकारची भ्रष्टाचाराची वाळवी लागलेली बघून खरंतर समाजमंन एक प्रकारे बधिर झाल्यासारखे वाटते. ज्ञानाने मनुष्य हा प्रबळ होतो. तो विचार करतो .तो विवेकी होतो. तो संस्कारित होतो. हे सर्व होत असताना सुद्धा अशा संस्थांवर बसणारे संस्थाचालक हे अविवेकी, अविचारी, भ्रष्ट आणि अनैतिक धंदा घेऊन बसलेले हे विश्वस्त या संस्थेचे “रखवालदार “न होता” मालक” होत असतात. आणि त्याला एक प्रकारचे नोकरशहा सुद्धा सामील होतात . त्यांना सहकार्य करतात. राजकारणी त्यांना सहाय्य करतात. त्यावेळी समाजमन हे बधिर होतं.
दुर्दैवाने संस्थेतील शिक्षकच चोरी करताना सापडतो आणि तो संस्थेच्या अध्यक्षा चा मुलगाच असतो.आणि त्या अशा घटनां चं चित्रण रघा नावाच्या कादंबरीतून जेव्हा प्रगट होत असतं तेव्हा साहजिकच मनात विचार येतो या समाज व्यवस्थेचे पुढे कसे काय होणार..? आपल्या लोकशाहीत, आपल्या संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे ,”शिक्षण हे जर वाघिणीचे दूध होते “तर या दुधाचे नासक्या दुधात रूपांतर करण्याचे पाप कर्म या असल्या भ्रष्ट संचालकां मुळे झाले.
विशेष म्हणजे लोकशाही मार्गाने निवडून आलेले असे हे संस्थाचालक पुन्हा पुन्हा कसे काय निवडून येऊ शकतात? खर तर हे गणित सर्वसामान्य लोकांना सुद्धा समजतं. जिथे मतदान आपलं पवित्र कार्य म्हटले जाते .परंतु तेच मतदान हे आर्थिक देवाण घेवाणी चे स्वरूप धारण करते. तेव्हा नुसत्या संचालक मंडळाला किड,वाळवी लागलेली नसते तर ती कीड समाज व्यवस्थेत पसरली आहे असं जाणवते.
” यथा राजा तथा प्रजा “या म्हणी प्रमाणे जशी समाज व्यवस्था निर्माण होते. त्या समाजातील तशाच प्रकारचे संस्थाचालक, राजकारणी, नोकरशहा ही निर्माण होताना दिसत असतात .
अशी बरबटलेली,हापापलेली , अनैतिक समाजव्यवस्था या संविधान करत्यांना सुद्धा मान्य नव्हती .या भूमीत जन्मलेल्या महा मानवांना सुद्धा ही व्यवस्था लोकशाहीच्या नावाने अशा कुजलेल्या अवस्थेत जाईल याची कल्पना नव्हती.
तरीसुद्धा या कादंबरीतील ” रघा” हा खूपच आशावादी, संघर्षमय ,नितीमूल्य जपणारा असा रंगविण्यात आलेला आहे. खरं तर स्वातंत्र्य पूर्वकाळ आणि त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्या नंतर शिक्षणाला खूपच महत्त्व प्राप्त झाल्यामुळेच एक चांगल्या विचाराने प्रेरित होऊन आपल्या दानशूर दात्यांनी, महापुरुषांनी, आपल्यातील महा मानवांनी या शैक्षणिक संस्था निर्माण केल्या. त्या त्यावेळी त्यांच्या भावना पवित्र होत्या .शिक्षण हे आदर्श समाज निर्मिती करण्यासाठी खूप मोठं काम होतं. आणि त्याप्रमाणे हे काम मोठ्या जोमाने संपूर्ण भारतभर सुरूही झाले. मोठ मोठ्या शैक्षणिक संस्था निर्माण ही झाल्यात परंतु त्यानंतरच्या ती 30-40 वर्षानंतर चा काळ बदलला. राजकारण, मतदान आलं. आणि ही व्यवस्था सडकी, नासकी होऊ लागली. याला कारण म्हणजे मानवी मनाचा हापापलेपणा , स्वार्थी वृत्ती, सत्तेचा माज, मला त्याच्याशी काय देणं घेणं..? मला काय मिळालं..? मला काय काय द्यायचे ते द्या..! लोकशाही मधली हूकुमशाही या संस्थाचालकांच्या माजलेल्या वृत्तीचे दर्शन या कादंबरीत जाणवते.
तरीसुद्धा कादंबरीच्या नायक हथबल, एकाकी झाला असला तरी मोठा आशावादी जाणवतो. हेच मोठं आशादायी चित्र ही कादंबरी वाचल्यानंतर जाणवते.
” रघा ” कादंबरीच्या शेवट हा खूपच आशादायी झाला असून सेवानिवृत्ती च्या रात्री आठ वाजता घरी जायला निघताना आपण जिथे सेवा दिली त्या पायरी ची धूळ यातील नायक “रघा ” कपाळी लावतो. त्यावेळी त्याचे डोळे अश्रुंनी भरून येतात. तशा परिस्थितीत कॉलेजच्या गेटवर एक सीनियर सिक्युरिटी दादा” रघा” च्या गाडी पुढे येऊन उभे राहिले . त्यांचा चेहरा गंभीर होता व डोळे पाणावलेले होते. रघा त्यांच्या पायाला स्पर्श करतो.
आणि माय माऊली ज्ञान मंदिर महाविद्यालयाचा ते कायमचा निरोप घेतात.
एका अति सामान्य सिक्युरिटी गार्ड चे अश्रूंचे दोन थेंब असामान्य कार्य करणाऱ्या “रघा” च्या कार्याचे फलित जाणवते.
अति सामान्य माणसाच्या हृदयाच्या भावना जपण्याची दाहकता या लिखाणात असून ध्येयाची पराकाष्टा , प्रेरणेच्या माध्यमातून वास्तव जीवनातील प्रतीकात्मक असा शेवट लेखकाने येथे केला आहे .
. त्या अर्थाने रघा ही एक अत्यंत उत्कृष्ट अशी दाहक संघर्ष गाथा असून मानवी जीवनाच्या नैतिक मूल्याच्या ऱ्हास वाचवणारी आहे यात शंका नाही .
शब्दांकन
गोकुळ बागूल
२१, टेलिफोन कॉलनी,
अमळनेर.
मो.९४२२२७६१४०

