अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल” — वैज्ञानिक दृष्टिकोनावर प्रभावी वक्त्यांची कार्यशाळा संपन्न
![]()
“अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल” — वैज्ञानिक दृष्टिकोनावर प्रभावी वक्त्यांची कार्यशाळा संपन्न
अमळनेर प्रतिनिधी :
मानवी प्रगतीच्या वाटचालीत अंधश्रद्धेचे असंख्य अडथळे पसरलेले आहेत. आपण चालत असलेली वाट अनेकदा अंधारी असते; मात्र त्या वाटेवर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रकाशझोत टाकला, तर अडथळे स्पष्ट दिसू लागतात आणि प्रगतीचा मार्ग सुकर होतो, असे प्रभावी प्रतिपादन कीर्तीवर्धन तायडे यांनी केले. ते पंचायत समिती शिक्षण विभाग अमळनेर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अमळनेर व युवा कल्याण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वक्त्यांच्या कार्यशाळेत बोलत होते.
28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विठ्ठल नगर येथील अभ्यासिकेत “वैज्ञानिक दृष्टिकोन” या विषयावर ही कार्यशाळा पार पडली. विविध क्षेत्रांत कार्यरत आणि विज्ञानाची आवड जोपासणाऱ्या मान्यवरांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेरचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार होते.
कार्यशाळेचे प्रास्ताविक सुनील वाघमोडे यांनी केले. त्यांनी वैज्ञानिक विचारसरणी समाजात रुजविण्याची गरज अधोरेखित केली. यावेळी वैज्ञानिक दृष्टिकोनावर तयार करण्यात आलेले विशेष वाचन साहित्य सर्व वक्त्यांना वितरित करण्यात आले. 28 फेब्रुवारी विज्ञान दिनानिमित्त हे सर्व वक्ते विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती देण्यात आली.
या महत्त्वपूर्ण कार्यशाळेत पल्लवी पाटील, भारती पाटील, तेजस्विनी पाटील, तरन्नुम मॅडम, विजयकुमार मोरे, डी. ए. धनगर, योगेश भदाणे, प्रा. डॉ. राहुल निकम, ज्ञानेश्वर मोरे, संजय जाधव, रूपाली पाटील, डॉ. वंदना पाटील, अशोक रघुनाथ पाटील, रामेश्वर भदाणे, अशोक बिऱ्हाडे, महादू बैसाणे, निरंजन पेंढारे, भैय्यासाहेब साळुंखे, मिलिंद पाटील, योगेश पाटील, मिलिंद निकम, गोकुळ पाटील, निवेदिता कापडणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यशाळेच्या शेवटी डी. ए. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. वैज्ञानिक विचारांची बीजे समाजात रुजवून अंधश्रद्धेचा अंधार दूर करण्याचा निर्धार व्यक्त करत कार्यशाळेची उत्साहात सांगता झाली.

