स्वरांजली”तून अजरामर आठवणींना उजाळा — अमळनेरमध्ये धर्मेंद्रजी व लतादीदींना 1 मार्चला सुरेल अभिवादन!
![]()
“स्वरांजली”तून अजरामर आठवणींना उजाळा — अमळनेरमध्ये धर्मेंद्रजी व लतादीदींना 1 मार्चला सुरेल अभिवादन!
अमळनेर प्रतिनिधी :
भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनयाचे महामेरू स्व. धर्मेंद्रजी आणि गानकोकिळा स्व. लता मंगेशकर यांच्या अजरामर स्मृतींना उजाळा देण्यासाठी अमळनेरमध्ये १ मार्च रोजी ‘स्वरांजली’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वरांजली म्युझिकल ग्रुपतर्फे सादर होणारी ही सुरेल मैफल जुना टाऊन हॉल येथे रंगणार असून, रसिकांसाठी अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी ठरणार आहे.
रविवार, १ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात स्व. धर्मेंद्रजी यांच्या चित्रपटांतील सदाबहार, भावस्पर्शी आणि जोशपूर्ण गाण्यांचा प्रवास उलगडला जाणार आहे. त्याचबरोबर स्व. लतादीदींच्या मधुर, जादुई आणि काळजाला भिडणाऱ्या स्वरांनी सजलेली अजरामर गीते सादर केली जाणार आहेत.
धर्मेंद्रजींच्या अभिनयातील भावविश्व आणि लतादीदींच्या स्वरातील अलौकिक गोडवा यांचा संगम या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे. जुन्या सुवर्णकाळातील गाण्यांच्या आठवणींना उजाळा देत रसिकांना भूतकाळाच्या सुरेल प्रवासात नेण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून होणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन किशोर देशपांडे आणि मिलिंद पाटील यांनी केले असून, शहरातील सर्व संगीतप्रेमींनी या मैफिलीला मोठ्या संख्येने उपस्थित राहून महान कलावंतांना सुरेल मानवंदना द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
अमळनेरकरांसाठी ही एक खास सांगीतिक सायंकाळ ठरणार असून, सुरेल गाण्यांच्या दरवळात न्हाऊन निघण्याची ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
—
✨ “स्वर अमर… आठवणी अजरामर!” 🎶

