“चलो मुंबई”चा निर्धार: जुनी पेन्शन हक्कासाठी आझाद मैदानावर शिक्षक-कर्मचाऱ्यांचा एल्गार!, ५ मार्च रोजी राज्यभरातील पेन्शनग्रस्त, सेवानिवृत्त व 2005 पूर्वी नियुक्त बांधवांचे एकदिवसीय आंदोलन
![]()
“चलो मुंबई”चा निर्धार: जुनी पेन्शन हक्कासाठी आझाद मैदानावर शिक्षक-कर्मचाऱ्यांचा एल्गार!
५ मार्च रोजी राज्यभरातील पेन्शनग्रस्त, सेवानिवृत्त व 2005 पूर्वी नियुक्त बांधवांचे एकदिवसीय आंदोलन
अमळनेर प्रतिनिधी –(ईश्वर महाजन(
“जुनी पेन्शन हा आमचा हक्क आहे, भीक नाही!” या ठाम भूमिकेतून महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने ५ मार्च २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर एकदिवसीय आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. सोमवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या ऑनलाईन बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. बैठकीत राज्यभरातील पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व कार्यकारिणी सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत “चलो मुंबई”चा नारा दिला.
संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तसेच सर्व सेवानिवृत्त बांधवांना तात्काळ जुनी पेन्शन जाहीर करावी, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत शासनाने सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक भूमिका मांडावी, तसेच शिक्षण क्षेत्रातील सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे, या मागण्यांचा ठाम उच्चार करण्यात आला.
बैठकीत आंदोलनासाठी व्यापक जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. कार्यकारिणी सदस्य व जिल्हाध्यक्षांनी आपल्या-आपल्या भागातील शाळांना भेटी देऊन पेन्शन प्रश्नाचे गांभीर्य समजावून सांगावे व ५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आझाद मैदान येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले.
आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे मयत कर्मचाऱ्यांच्या डिजिटल प्रतिमा आंदोलनस्थळी प्रदर्शित केल्या जाणार आहेत. तसेच त्यांच्या सेवाकाळाची व परिस्थितीची माहिती पुस्तिकेच्या स्वरूपात मंत्र्यांना सादर केली जाणार आहे. यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांचे फोटो व माहिती तात्काळ उपसचिव मारोती खेडकर सर (संपर्क: ८८०६२५९१२४) यांच्याकडे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र फलक उभारण्यात येणार असून त्यांची नावे मार्गदर्शक सल्लागार मा. काकासाहेब कोल्हे (संपर्क: ९४२००१८९१८) यांच्याकडे २७ फेब्रुवारीपूर्वी पाठविणे आवश्यक आहे.
संघटनेने स्पष्ट केले की, मयत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय, सेवानिवृत्त बांधव, २००५ पूर्वी नियुक्त कर्मचारी, टप्पा अनुदानित बांधव यांनी एक दिवसाची रजा टाकून मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे. “प्रत्येक शिक्षक-कर्मचाऱ्याला जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे; संघटना जिवंत ठेवण्यासाठी शेवटपर्यंत लढा देऊ,” असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
शासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास सर्वोच्च न्यायालयातील पुढील तारखेनंतर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आमरण उपोषणासाठी इच्छुकांनी आपली नावे सचिव भास्कर देशमुख सर (संपर्क: ८८५०७००८३७) यांच्याकडे नोंदवावीत, असे सांगण्यात आले. उपोषणापूर्वी रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २७ फेब्रुवारीपूर्वी उपस्थित राहणाऱ्या कार्यकारी सदस्यांनी आपली माहिती कळवावी, जेणेकरून यादी तयार करून त्याच दिवशी नोंदणी फाईल सादर करता येईल, असे संघटनेचे अध्यक्षांनी नमूद केले.
पेन्शन हा केवळ आर्थिक मुद्दा नसून, आयुष्यभर शिक्षणसेवा केलेल्या शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या सन्मानाचा प्रश्न आहे. या सन्मानाच्या लढ्यात राज्यभरातील बांधवांनी एकदिलाने सहभागी होऊन “चलो मुंबई”चा नारा बुलंद करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ५ मार्च रोजी आझाद मैदानावर हा आवाज शासनापर्यंत पोहोचणार, यात शंका नाही.

