ए. टी. झांबरे विद्यालय जळगाव येथे ‘हिंद-दी-चादर’ अभियानाचा महाजागर; गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त विविध उपक्रमांची आदर्श अंमलबजावणी
![]()
ए. टी. झांबरे विद्यालय जळगाव येथे ‘हिंद-दी-चादर’ अभियानाचा महाजागर; गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त विविध उपक्रमांची आदर्श अंमलबजावणी
जळगाव (प्रतिनिधी): भारताच्या गौरवशाली इतिहासात अजोड शौर्य आणि प्रखर त्यागाचे प्रतीक असलेले नववे शीख गुरु, ‘हिंद-दी-चादर’ गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने राज्यभर वर्षभर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. शासनाच्या या धोरणात्मक निर्णयाची अत्यंत प्रभावी आणि नियोजनबद्ध अंमलबजावणी जळगाव येथील एटी झांबरे माध्यमिक विद्यालयात करण्यात आली. शाळेने हा उपक्रम एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता, महिनाभराच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने विविध उपक्रमांचे आयोजन करून गुरु तेगबहादूर यांच्या शौर्यगाथेचा जागर केला.
विद्यार्थ्यांमध्ये त्याग, धर्मरक्षण आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना खोलवर रुजावी, या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत आनंदाने आणि उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला.
या अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांच्या मालिकेत सुरुवातीला भव्य प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. हातामध्ये गुरुजींच्या शौर्याचे दर्शन घडवणारे फलक आणि “जो बोले सो निहाल, सत श्री अकाल” अशा घोषणांनी विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला. यानंतरच्या टप्प्यात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि कलात्मक गुणांना वाव देण्यासाठी निबंध, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन वेगवेगळ्या दिवशी करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी गुरु तेगबहादुर यांनी काश्मिरी पंडितांच्या रक्षणासाठी दिल्लीच्या चांदनी चौकात दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचे ओघवत्या भाषेत वर्णन केले, तर चित्रकला स्पर्धेतून गुरुजींचे तेजस्वी व्यक्तिमत्व कागदावर उमटवले. या सर्व स्पर्धांमधून विद्यार्थ्यांची वैचारिक प्रगल्भता आणि इतिहासाप्रती असलेली आस्था दिसून आली.
केवळ स्पर्धात्मक उपक्रम न राबवता, विद्यार्थ्यांना इतिहासाची प्रत्यक्ष प्रचिती यावी यासाठी शाळेने विशेष सत्रांचे आयोजन केले होते. यामध्ये गुरु तेग बहादूर यांच्या जीवनचरित्रावर आधारित एक प्रेरणादायी ‘जीवनपट’ (डॉक्युमेंटरी) सर्व विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला. तत्कालीन जुलुमी सत्तेपुढे न झुकता, मानवी हक्कांच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान पाहून विद्यार्थ्यांच्या मनावर या इतिहासाचा खोलवर परिणाम झाला. यासोबतच तज्ज्ञ शिक्षकांनी दिलेल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानांतून “भय कोणास दाखवू नका आणि कोणाचे भय बाळगू नका” हा गुरु तेगबहादूर यांचा अमर संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला. या उपक्रमांच्या साखळीमुळे विद्यार्थ्यांच्या विचारांवर सकारात्मक परिणाम झाला असून, त्यांच्यात धैर्य आणि परधर्माचा आदर करण्याची वृत्ती निर्माण झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी गुरु तेग बहादूर यांचे आदर्श विचार आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारण्याचा संकल्प यावेळी केला.
या संपूर्ण प्रदीर्घ उपक्रमाचे यशस्वी नियोजन आणि नेतृत्व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे यांनी केले. असे उपक्रम हे केवळ सोपस्कार न राहता ते खऱ्या अर्थाने संस्काराचे माध्यम बनावेत आणि नवीन पिढीला आपल्या देशाला लाभलेल्या थोर वारशाची ओळख व्हावी, हाच यामागचा प्रामाणिक उद्देश असल्याचे मुख्याध्यापिका श्रीमती झांबरे यांनी नमूद केले. शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सांघिक परिश्रमांमुळे आणि टप्प्याटप्प्याने केलेल्या अचूक नियोजनामुळे हे महिनाभर चाललेले अभियान अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वी झाले. ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाने राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे आणि शासनाच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल शिक्षण क्षेत्रातून मोठे कौतुक होत आहे.

