छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानास्पद तुलनेविरोधात अमळनेर भाजपा कार्यकर्त्यांचा जोरदार जाहीर निषेध!
![]()
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानास्पद तुलनेविरोधात अमळनेर भाजपा कार्यकर्त्यांचा जोरदार जाहीर निषेध!
अमळनेर प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि रयतेचे राजे आहेत. त्यांच्या शौर्य, स्वातंत्र्यलढा आणि स्वराज्याच्या आदर्शाला कोणत्याही प्रकारे कमी लेखता येणार नाही. परंतु महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टीपू सुलतान यांच्याशी करून त्यांना “समकक्ष” मानण्याचे वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य अतिशय निंदनीय, अपमानास्पद आणि महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनतेच्या भावनांना दुखावणारे आहे. टीपू सुलतान यांच्या इतिहासाशी संबंधित विविध आरोप आणि त्यांच्या कृतींमुळे त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान योद्ध्याशी तुलना करणे हे पूर्णपणे अयोग्य आणि अस्वीकार्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या जुलमी कारभाराविरुद्ध स्वराज्याची स्थापना केली, तर टीपू सुलतान यांच्या काळातील काही घटना पूर्णपणे भिन्न आणि विवादास्पद आहेत. अशी तुलना करून शिवरायांचा अपमान करणे हे राजकीय स्वार्थासाठी इतिहासाची विकृती करण्याचे काम आहे.
याच पार्श्वभूमीवर अमळनेर येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज (सोमवार, १६ फेब्रुवारी २०२६) सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ एकत्र येऊन हर्षवर्धन सपकाळ यांच्या या वक्तव्याचा जोरदार जाहीर निषेध केला.
भारतीय जनता पार्टी पदाधिकारी,कार्यकर्ते आणि सर्व शिवप्रेमी नागरिक हे स्पष्ट करतात की, छत्रपती शिवाजी महाराज हे अद्वितीय आणि अतुलनीय आहेत. त्यांच्या अपमानास्पद तुलनेचा आम्ही कडाडून निषेध करतो. हर्षवर्धन सपकाळ यांनी त्वरित आपल्या वक्तव्यावरून माफी मागावी, अशी मागणी आम्ही करतो.

