अमळनेर शहरात पाणीपुरवठा नियोजनाला गती; ७–८ दिवसांवरून ४ दिवसांआड पुरवठा सुरू लवकरच ३ दिवसांआड पाणी देण्याचे लक्ष्य – नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
![]()
अमळनेर शहरात पाणीपुरवठा नियोजनाला गती; ७–८ दिवसांवरून ४ दिवसांआड पुरवठा सुरू
लवकरच ३ दिवसांआड पाणी देण्याचे लक्ष्य – नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर शहरातील पाणीपुरवठा अधिक सुरळीत व नियोजित करण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. मा. आमदार श्री. शिरीष दादा चौधरी व मा. श्री. रवींद्र चौधरी (रवी बापू) यांच्या मार्गदर्शनाखाली मागील आठवड्यात नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, पाणीपुरवठा सभापती तसेच सन्माननीय नगरसेवकांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा विभागाची महत्त्वाची बैठक पार पडली.
गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. काही भागात ७ ते ८ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. मात्र प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि तातडीने राबविण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे आता परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. सध्या ४ दिवसांआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून शहरातील काही भागात त्याची अंमलबजावणी देखील यशस्वीरित्या सुरू झाली आहे.
पुढील नियोजन
येत्या आठवड्यापर्यंत संपूर्ण शहरात ३ दिवसांआड पाणीपुरवठा सुरू करण्याचे प्रशासनाचे लक्ष्य आहे. वीजपुरवठा सुरळीत राहिल्यास आणि इतर तांत्रिक अडचणी उद्भवल्या नाहीत तर भविष्यात २ दिवसांआड पाणी देण्याचा मानस असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
नागरिकांना सहकार्याचे आवाहन
पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पाणीपुरवठा विभागाने नमूद केले आहे. पाणी भरून झाल्यानंतर नळ (तोटी) व्यवस्थित बंद ठेवावेत, जेणेकरून पाण्याची नासाडी होणार नाही. पाणी वाचविल्यास शेवटच्या घरापर्यंत पुरेसा दाब मिळू शकतो आणि सर्वांना वेळेवर पाणी मिळण्यास मदत होईल.
“पाणी वाचवा – सहकार्य करा” असे आवाहन करत
श्री. कैलास नामदेव पाटील, सभापती, पाणीपुरवठा विभाग, अमळनेर नगर परिषद यांनी ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

