सर्जक’ला राज्यस्तरीय मानाचा मुजरा! युवा लेखक मयूर बागुल यांना स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२४ जाहीर
![]()
‘सर्जक’ला राज्यस्तरीय मानाचा मुजरा!
युवा लेखक मयूर बागुल यांना स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२४ जाहीर
अमळनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे सन २०२४ च्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, पुणे जिल्ह्यातील केसनंद येथील युवा लेखक मयूर बागुल यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय सन्मान जाहीर झाला आहे. त्यांच्या ‘सर्जक’ या पुस्तकासाठी शेती व शेतीपूरक व्यवसाय विषयक उत्कृष्ट लेखनाबद्दल एक लाख रुपयांचा ‘वसंतराव नाईक पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.
‘सर्जक’ या पुस्तकातून मयूर बागुल यांनी ग्रामीण जीवनाचे सूक्ष्म वास्तव, शेतीतील नवकल्पना, शेतकऱ्यांचा संघर्ष आणि बदलत्या काळातील कृषीपूरक व्यवसायांच्या नव्या संधी यांचे अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी चित्रण केले आहे. शेतकऱ्यांच्या दैनंदिन आयुष्याशी नाळ जोडणारे आणि आधुनिक दृष्टिकोन देणारे हे लेखन राज्यातील कृषी व साहित्य क्षेत्रात विशेष दखल घेण्यासारखे ठरले आहे.
या पुस्तकाच्या लेखनप्रवासात किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब तसेच सहज जलबोध अभियानाचे प्रणेते व वरिष्ठ भूजल वैज्ञानिक उपेंद्र दादा धोंडे यांचे मार्गदर्शन लाभले. चपराक प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकासाठी प्रकाशक श्री. घनश्याम पाटील व चपराक परिवारातील सदस्यांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे.
राज्यस्तरीय या मानाच्या पुरस्कारामुळे महाराष्ट्रातील साहित्य व सामाजिक क्षेत्रात अभिमानाची भावना व्यक्त होत असून, विविध सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक संस्थांकडून मयूर बागुल यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण प्रश्नांवर ठोस, अभ्यासपूर्ण आणि सकारात्मक दृष्टीकोनातून लेखन करणाऱ्या नव्या पिढीतील लेखक म्हणून त्यांचे नाव आता राज्यभर चर्चेत आले आहे.
मयूर बागुल यांच्या या यशामुळे स्थानिक तरुणांमध्ये लेखन, संशोधन आणि कृषीविषयक अभ्यासाची नवी उमेद निर्माण होणार असून, ग्रामीण साहित्याला एक सक्षम आणि अभ्यासू दिशा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

