कमजोरीतूनच घडते यशाची ताकद!” — डी. ए. धनगर यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन  व्ही. झेड. पाटील हायस्कूल, शिरूड येथे दहावीचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न
1 min read

कमजोरीतूनच घडते यशाची ताकद!” — डी. ए. धनगर यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन व्ही. झेड. पाटील हायस्कूल, शिरूड येथे दहावीचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

Loading

“कमजोरीतूनच घडते यशाची ताकद!” — डी. ए. धनगर यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

व्ही. झेड. पाटील हायस्कूल, शिरूड येथे दहावीचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

अमळनेर प्रतिनिधी :
“प्रत्येक व्यक्तीमध्ये काही कमजोरी तर काही बलस्थाने असतात. अनेकजण कमजोरीच्या न्यूनगंडामुळे खचून जातात आणि त्यामुळे त्यांची प्रगती खुंटते. परंतु जर त्या कमजोरीलाच आपण आपले बलस्थान बनवले, तर यश आपल्या पायाशी येणारच,” असे प्रेरणादायी प्रतिपादन खानदेश साहित्य संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डी. ए. धनगर यांनी केले. ते व्ही. झेड. पाटील हायस्कूल, शिरूड येथे आयोजित इयत्ता दहावीच्या निरोप समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीच्या चेअरमन श्रीमती पुष्पलता अशोक पाटील या होत्या. यावेळी शालेय समिती सदस्य श्री वसंत भगवान पाटील, श्री पुंजू एकोबा पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे डी. ए. धनगर सर यांनी विद्यार्थ्यांना संघर्षातून जीवन कसे घडवायचे, अपयशातून यशाची शिडी कशी चढायची याबाबत अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले.
ते पुढे म्हणाले, “दहावीचा निरोप समारंभ म्हणजे दुग्ध-शर्करा योग आहे. शाळेच्या उंबरठ्यावरून आता तुम्ही जगाच्या विशाल अवकाशात पाऊल ठेवणार आहात. महाविद्यालयीन जीवनात विविध क्षेत्रांत आपली छाप उमटवण्याची संधी तुमच्यासमोर आहे. यशस्वी होण्यासाठी संस्कारक्षम, शिस्तबद्ध आणि कुशल विद्यार्थी म्हणून वर्तन असणे अत्यावश्यक आहे. योग्य मूल्ये आणि सातत्यपूर्ण परिश्रम यामुळेच प्रगतीचे दार उघडते.”
विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत शाळेतील आठवणींना उजाळा दिला. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला भेटवस्तू देऊन आपला स्नेहभाव जपला. भावनिक वातावरणात शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये निरोपाचे क्षण अनुभवले गेले.
कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री अनिल शिवाजी पाटील, श्री पी. जे. निकम सर, श्रीमती सविता बोरसे मॅडम, श्री गुलाब बोरसे सर, श्री जाधव सर, श्रीमती योगिता देशमुख मॅडम, श्री भूषण सोनवणे सर, श्री संजय पाटील, श्री अरुण पाटील, श्री राहुल लांडगे आदी शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री गुलाब बोरसे सर यांनी केले, तर सूत्रसंचालन कु. कल्याणी भूषण वानखेडे व कु. प्रज्ञावती रविंद्र बैसाणे यांनी प्रभावीपणे पार पाडले.
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत नव्या स्वप्नांची चमक आणि शिक्षकांच्या शुभेच्छांचा आशीर्वाद घेऊन हा निरोप समारंभ उत्साहात व भावुक वातावरणात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *