जातपात नाही, माणुसकी मोठी” — नाथभक्त महेश पाटील यांचा सामाजिक संदेश ठरला प्रेरणादायी
1 min read

जातपात नाही, माणुसकी मोठी” — नाथभक्त महेश पाटील यांचा सामाजिक संदेश ठरला प्रेरणादायी

Loading

“जातपात नाही, माणुसकी मोठी” — नाथभक्त महेश पाटील यांचा सामाजिक संदेश ठरला प्रेरणादायी

पारोळा प्रतिनिधी

बहादरपूर व शिरसोदे परिसरात सामाजिक बांधिलकी जपणारे आणि नाथसंप्रदायाचे श्रद्धावान भक्त म्हणून ओळखले जाणारे महेश पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यातून माणुसकीचा उंच आदर्श निर्माण केला आहे. पारोळा येथील मानलेल्या बहिणीच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात स्वतः अंतरपाट धरून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली आणि “नाती रक्ताचीच असतात असे नाही, ती मनाचीही असतात,” हे कृतीतून दाखवून दिले.
सविस्तर वृत्त असे की, पाळण्यातूनच वंदना राजेंद्र चौधरी यांना महेश पाटील यांनी आपली बहीण मानले होते. वंदना चौधरी व राजेंद्र चौधरी यांच्या मुलीचा विवाह यापूर्वी सोनगिरी येथे झाला होता; मात्र काही कारणास्तव त्या वैवाहिक नात्याचा घटस्फोट झाला. या कठीण प्रसंगी कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत महेश पाटील यांनी आपल्या ‘भाची’साठी योग्य स्थळ शोधण्याचा निर्धार केला. त्यांनी पुढाकार घेत बहादरपूर येथील भागवत शामराव चौधरी यांच्या सुपुत्राशी तिचा विवाह जुळवून आणला.
या विवाह सोहळ्यात चौधरी समाजाच्या कार्यक्रमात पाटील समाजातील महेश पाटील यांनी अंतरपाट धरणे, हा केवळ एक विधी नव्हता; तो सामाजिक ऐक्याचा आणि जातभेदापलीकडील नात्यांचा जिवंत संदेश होता. या कृतीमुळे सर्वत्र त्यांच्या कार्याचे कौतुक झाले.
यावेळी बोलताना महेश पाटील म्हणाले, “जातपात ही ईश्वरनिर्मित नसून मानवाने निर्माण केलेली आहे. आपण कोणत्या समाजात जन्माला आलो हे महत्त्वाचे नाही; समाजासाठी आणि माणुसकीसाठी आपण काय करतो हेच खरे महत्त्वाचे आहे.” त्यांच्या या विचारांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
समारंभात भटू शामराव चौधरी व भागवत शामराव चौधरी यांच्या हस्ते महेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य डॉ. प्रवीण पाटील, पत्रकार प्रा. योगेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
“महेश पाटील यांचे कार्य खरोखरच उल्लेखनीय आहे. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची पावती आज समाजाकडून त्यांना मिळत आहे,” असे गौरवोद्गार जिल्हा परिषद माजी सदस्य डॉ. प्रवीण पाटील यांनी काढले.
समाजात नात्यांचे धागे जपणारे, संकटात आधार देणारे आणि जातीपातीच्या भिंती पाडून माणुसकीचा पूल उभारणारे महेश पाटील यांचे हे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *