त्या अनामिकांच्या चिठ्ठ्यातून प्रकटल्या निर्भया!*  *नेरोलॅक पेंट्स आणि दिशान्तर संस्थेचा स्तुत्य उपक्रम  *५०० ग्रामीण विद्यार्थिनींसाठी आरोग्य साहित्याचे वितरण
1 min read

त्या अनामिकांच्या चिठ्ठ्यातून प्रकटल्या निर्भया!* *नेरोलॅक पेंट्स आणि दिशान्तर संस्थेचा स्तुत्य उपक्रम *५०० ग्रामीण विद्यार्थिनींसाठी आरोग्य साहित्याचे वितरण

Loading

*त्या अनामिकांच्या चिठ्ठ्यातून प्रकटल्या निर्भया!*

*नेरोलॅक पेंट्स आणि दिशान्तर संस्थेचा स्तुत्य उपक्रम

*५०० ग्रामीण विद्यार्थिनींसाठी आरोग्य साहित्याचे वितरण

*चिपळूण/ खेड (प्रतिनिधी- वार्ताहर)*

*ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना मासिक पाळी संदर्भातील शास्त्रीय माहिती मिळावी आणि त्यांच्या मनातील भीती व संकोच दूर व्हावा, या उद्देशाने कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेड आणि दिशान्तर संस्था, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘निर्भया’ हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. या प्रकल्पांतर्गत चिपळूण तालुक्यातील तीन प्रमुख शाळांमधील सुमारे ५०० विद्यार्थिनींना मार्गदर्शन आणि आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले.*

*जागतिक संकल्पनेतला उपक्रम*
यावर्षी संयुक्त राष्ट्र संघाने (United Nations) जागतिक महिला दिनानिमित्त मासिक पाळी आरोग्य आणि जागृतीवर विशेष भर दिला आहे. याच जागतिक संकल्पनेला अनुसरून ‘निर्भया’ प्रकल्पांतर्गत राबविण्यात आलेला हा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला. ‘मासिक पाळी आरोग्य जागृती, सन्मान आणि समता सशक्तिकरण’ हे या प्रकल्पाचे मुख्य सूत्र होते.

*तीन विद्यालये ५०० विद्यार्थिनी*
खेड तालुक्यातील यशवंत विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय धामणंद, न्यू इंग्लिश स्कूल आंबडस आणि चिपळूण तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज खेर्डी चिंचघरी (सती) या तीन विद्यालयांमध्ये या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. या शाळांतील ५०० विद्यार्थिनीं सहभागी झाल्या होत्या.

*डॉक्टरांचे मार्गदर्शन*
प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अपर्णा कुलकर्णी-उत्पात (BAMS, MA, MSc) यांनी अत्यंत ओघवत्या आणि संवेदनशील वृत्तीने विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. मासिक पाळी ही एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया कशी आहे, या काळात आहार, व्यायाम आणि स्वच्छता कशी राखावी, यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या उत्तरार्धात मुलींनी विचारलेल्या विविध प्रश्नांना डॉ. अपर्णा यांनी शास्त्रीय उत्तरे देऊन त्यांच्या मनातील शंकांचे निरसन केले.
*आरोग्य संच व पुस्तिका*
केवळ मार्गदर्शनच नव्हे तर मुलींना प्रत्यक्ष मदत मिळावी यासाठी प्रत्येक विद्यार्थिनीला ‘निर्भया’ मार्गदर्शक पुस्तिका देण्यात आली. या पुस्तिकेत मासिक पाळी दरम्यान पाळावयाची पथ्ये आणि स्वच्छतेबाबतची माहिती देण्यात आली आहे. तसेच, पर्यावरणाचे रक्षण आणि दीर्घकालीन वापरासाठी उपयुक्त असे ‘रियूजेबल सॅनिटरी पॅड्स’ (पुन्हा वापरण्यायोग्य सॅनिटरी पॅड) देखील सर्व विद्यार्थिनींना वितरित करण्यात आले.

*नेरोलॅक चे सामाजिक उत्तरदायित्व*
कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेडचे सामाजिक उत्तरदायित्व (CSR) आणि दिशान्तर संस्थेचे नियोजनबद्ध व्यवस्थापन यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी झाला. ग्रामीण भागातील मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेड या कंपनीच्या असोसिएट ऑफिसर ह्युमन रिसोर्स प्राजक्ता पाटील तसेच अनिशा निकम व सेजल बेलोसे तर दिशान्तर संस्थेतर्फे अध्यक्ष श्री. राजेश जोष्टे, सचिव सौ. सीमा यादव यांची उपस्थिती होती. कार्यक्रम मार्गदर्शन व सहकार्य कंपनीचे सीएसआर प्रमुख श्री संतोष देशमुख व यशस्वीतेसाठी लोटे प्लांट चे मनुष्यबळ विकास व्यवस्थापक नंदन सुर्वे यांचे योगदान राहिले. विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका मुख्याध्यापक यांच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वी झाला.

चौकट
…त्या अनामिका!*
सहभागी विद्यार्थिनींना त्यांच्या आरोग्य विषयक तसेच मासिक पाळी विषयक शंका- समस्या यांची एक अगदी छोटी चिट्टी लिहावयास सांगण्यात आली होती. यात त्या विद्यार्थिनीची कुठेही ओळख दिसता नये याची काळजी घेण्यात आली. कार्यक्रमाच्या दोन दिवसपूर्वी या चिठ्ठ्या एकत्र करण्यात आल्या. त्या अनामिकांच्या चिठ्ठ्यातून आरोग्य विषयक शंका -समस्यांचा उलगडा होण्यास मोठीच मदत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *