पूजेसोबत माणुसकीची उब : मंगळग्रह मंदिरातील सेवेकऱ्यांनी जपली भक्तांची माया
![]()
पूजेसोबत माणुसकीची उब : मंगळग्रह मंदिरातील सेवेकऱ्यांनी जपली भक्तांची माया
अमळनेर प्रतिनिधी :(ईश्वर महाजन)
धर्म म्हणजे केवळ पूजा-अर्चा नव्हे, तर मानवसेवा हीच ईश्वरसेवा — या वचनाचा जिवंत प्रत्यय अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात अनुभवायला मिळतो. राज्यभरातून आणि राज्याबाहेरूनही हजारो भाविक श्रद्धेने येथे दाखल होत असतात. मंगळदेवतेच्या कृपेने मनोकामना पूर्ण झाल्याच्या असंख्य अनुभवकथा या मंदिराशी जोडलेल्या आहेत.
मंगळग्रह सेवा संस्थानचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले आणि विश्वस्त मंडळ यांच्या दूरदृष्टीमुळे मंदिर परिसराचा चेहरामोहरा पूर्ण बदलला आहे. स्वच्छता, शिस्त, भक्तांसाठी सुविधा आणि नियोजनबद्ध व्यवस्था यामुळे हे मंदिर आज आदर्श धार्मिक केंद्र म्हणून ओळखले जात आहे. परिसरात पाऊल टाकताच जाणवणारी प्रसन्नता भाविकांच्या मनातील ताण हलका करते.
परंतु या मंदिराची खरी ओळख म्हणजे येथील सेवेकरी. भाविकांच्या सेवेसाठी सदैव हजर असणारे सेवेकरी नम्रता आणि समर्पणाची मूर्तीच वाटतात. डि. ए. सोनवणे सर यांच्यासारखे सेवाभावी कार्यकर्ते निस्वार्थ भावनेने भक्तांची सेवा करत असतात.
मंगळवारी होणाऱ्या मोठ्या यात्रेदरम्यान येथे भक्तांची प्रचंड गर्दी असते. अशाच एका प्रसंगी, गर्दीत थकलेल्या एका आईच्या बाळाला सेवेकऱ्याने मांडीवर घेतले आणि प्रेमाने सांभाळले. त्या सेवेकऱ्याच्या मांडीवर शांत झोपलेले बाळ — हा क्षण उपस्थित भाविकांसाठी भावनिक आणि प्रेरणादायी ठरला. त्या दृश्याने एक संदेश स्पष्ट झाला — येथे सेवा म्हणजे केवळ व्यवस्थापन नाही, तर माणुसकीची जपणूक आहे.
सेवेकऱ्यांच्या भावनेला शब्द मिळाले आहेत—
“आम्ही मंगलदाणीचे सेवेकरी,
भाविकांच्या बाळांचाही सांभाळ करी.
बाळ शांत झोपला मांडीवरी,
जनसेवा हीच मंगलदेवतेची सेवा खरी.”
अमळनेरचे मंगळग्रह मंदिर आज श्रद्धा, शिस्त, सेवा आणि संवेदनशीलतेचे प्रेरणास्थान बनले आहे. येथे येणारा प्रत्येक भाविक केवळ दर्शन घेऊन जात नाही, तर माणुसकीचा उबदार स्पर्श मनात साठवून परततो.

