कोकण दर्शन शैक्षणिक सहलीने बालाजी विद्यालयाचे विद्यार्थी झाले उल्हासित
![]()
कोकण दर्शन शैक्षणिक सहलीने बालाजी विद्यालयाचे विद्यार्थी झाले उल्हासित
अमळनेर प्रतिनिधी :
गांधली–पिळोदे येथील बालाजी विद्यालयाची बहुप्रतीक्षित शैक्षणिक सहल नुकतीच कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटन स्थळांच्या समृद्ध दर्शनाने अविस्मरणीय ठरली. या सहलीमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकातील ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाली.
या सहलीत महड गणपती, पाली गणपती, मोरगाव गणपती आदी अष्टविनायकांपैकी तीन गणपतींचे दर्शन विद्यार्थ्यांनी घेतले. सह्याद्री पर्वतरांगेतील घाट, कडे व डोंगर यांचा प्रत्यक्ष अनुभव घेत विद्यार्थ्यांनी निसर्गसौंदर्याचा आनंद लुटला. कोकण किनारपट्टीवरील काशीद बीचवर समुद्राच्या लाटांसोबत विद्यार्थ्यांनी मनसोक्त क्षण घालवले. त्यानंतर जलदुर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजिंक्य मुरुड-जंजिरा किल्ल्याचे दर्शन घेऊन त्याच्या अभेद्य रचनेची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.
सुंदर समुद्रकिनाऱ्याने सजलेल्या श्रीवर्धन येथे विद्यार्थ्यांनी समुद्रसौंदर्याचा आनंद घेतला. तेथील सागरी जीवसृष्टीबाबत माहिती मिळवत सुरमई, पापलेट, बांगडा, झिंगा, कोळंबी यांसारखे मासे प्रत्यक्ष पाहिले. रात्री कोकणी चवीचे शाकाहारी व मांसाहारी पदार्थांचा आस्वाद विद्यार्थ्यांनी घेतला.
दुसऱ्या दिवशी मराठ्यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याचे दर्शन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन, दरबार, राणी महल, बाजारपेठ, टकमक टोक, शिवाजी महाराजांची समाधी, शिवाई मंदिर आदी स्थळांची माहिती गाईडमार्फत विद्यार्थ्यांनी घेतली. साडेतीन तास चाललेल्या या भेटीत शिवचरित्राचा अभिमान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक चवदार तळे आंदोलनाने प्रसिद्ध असलेल्या महाड येथे भेट देण्यात आली. समाजशास्त्र शिक्षक आशिष शिंदे यांनी विद्यार्थ्यांना त्या आंदोलनाचा इतिहास समजावून सांगितला. पुढे प्रतापगड किल्ल्याला भेट देऊन अफजलखान वधाची ऐतिहासिक घटना व किल्ल्याचे महत्त्व जाणून घेतले.
महाराष्ट्राचे ‘काश्मीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर येथे १२ प्रसिद्ध पॉईंटना भेट देण्यात आली. मॅप्रो गार्डनमध्ये विद्यार्थ्यांनी जेली, चॉकलेट्सची खरेदी करत आनंद लुटला. त्यानंतर प्रति बालाजी, जेजुरी येथील खंडेरायाचे दर्शन घेण्यात आले. प्रवासादरम्यान माऊली ढाब्यावर स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद विद्यार्थ्यांनी घेतला.
या सहलीचा समारोप शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन झाला. संपूर्ण सहलीदरम्यान विद्यार्थ्यांच्या निवास व भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आल्याने विद्यार्थी व पालक समाधान व्यक्त करत होते.
या सहलीच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक सुनील काटे, शिक्षक चंद्रकांत निकुंभ, संदीप वंजारी, आशिष शिंदे, जयेश लोहार, शिक्षिका मीनाक्षी अहिरराव तसेच सहायक कर्मचारी संतोष पाटील, राहुल पाटील, भरत पवार यांनी परिश्रम घेतले. अध्यक्ष बापूसाहेब उदय पाटील, प्रा. भरत पाटील, डॉ. अनिल शिंदे, गिरीष शिंदे, जेष्ठ शिक्षक एन. वाय. पाटील, एन. एस. निळे यांनी शुभेच्छा दिल्या. अमळनेर परिवहन आगाराचे प्रमुख प्रमोद चौधरी, तुषार साळुंखे, गिरीष चुंबाळकर, वाहक गणेश धनगर व रामदास चौधरी यांनी सहकार्य केले. त्यांच्या सहकार्याबद्दल आशिष शिंदे सर यांनी आभार मानले.
ही सहल विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, संस्कार आणि आनंद यांचा सुंदर संगम ठरली.
सहलीतील काही क्षणचित्रे खालील प्रमाणे..


