अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणातील जप्त वाहनांचा लिलाव जाहीर , 18 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय, अमळनेर येथे प्रक्रिया; ट्रॅक्टर, डंपर, ट्रॉलीसह अनेक वाहनांचा समावेश
![]()
अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणातील जप्त वाहनांचा लिलाव जाहीर
18 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय, अमळनेर येथे प्रक्रिया; ट्रॅक्टर, डंपर, ट्रॉलीसह अनेक वाहनांचा समावेश
अमळनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणांमध्ये कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा सार्वजनिक लिलाव जाहीर करण्यात आला आहे. रूपेशकुमार सुराणा, तहसीलदार अमळनेर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती कळविली आहे.
अमळनेर तालुक्यात अवैध वाळू व इतर गौण खनिज वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल विभागामार्फत सातत्याने कारवाई सुरू आहे. या कारवायांमध्ये अनेक ट्रॅक्टर, ट्रॉली, डंपर तसेच इतर मालवाहू वाहने जप्त करण्यात आली होती. वाहन मालकांना दंड भरून वाहन ताब्यात घेण्याची संधी देण्यात आली होती; मात्र नियोजित कालावधीत वाहन न सोडवल्याने महसूल नियमांनुसार लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
तहसील कार्यालयाच्या आदेशानुसार ही लिलाव प्रक्रिया दिनांक ,18 फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता तहसील कार्यालय, अमळनेर येथे पार पडणार आहे. या लिलावात विविध गावांमधील वाहनधारकांची जप्त वाहने समाविष्ट असून त्यामध्ये महिंद्रा, स्वराज, इचर, अशोक लेलँड यांसारख्या कंपनींचे ट्रॅक्टर, डंपर व ट्रॉलींचा समावेश आहे. काही वाहनांचे नोंदणी क्रमांक उपलब्ध आहेत तर काहींचे क्रमांक नसलेली वाहनेही यादीत आहेत.
शासन नियमांनुसार प्रत्येक वाहनासाठी जप्ती शुल्क व लिलावाची प्रारंभिक किंमत निश्चित करण्यात आली आहे. काही वाहनांसाठी १० ते १२ हजार रुपये इतकी तर मोठ्या वाहनांसाठी लाखोंमध्ये प्रारंभिक किंमत ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही डंपर वाहनांसाठी १.२० लाख ते ३.०० लाख रुपयांपर्यंत प्रारंभिक किंमत निश्चित आहे.
इच्छुक नागरिकांनी लिलावात सहभागी होताना आवश्यक कागदपत्रे, ओळखपत्र तसेच नियमानुसार अनामत रक्कम भरून सहभाग नोंदवावा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. लिलावाची संपूर्ण प्रक्रिया महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पारदर्शक पद्धतीने पार पडणार आहे.
अवैध गौण खनिज उत्खननावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून भविष्यातही अशा कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले.
वाहन लिलावासंदर्भात अधिक माहितीसाठी तहसील कार्यालय, अमळनेर येथे संपर्क साधावा, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.


