विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा उत्सव: सी.आर. पाटील स्कूलचा वार्षिक सोहळा
![]()
विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा उत्सव: सी.आर. पाटील स्कूलचा वार्षिक सोहळा
अमळनेर प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि संस्कारप्रधान शिक्षणाचे दिमाखदार दर्शन घडवणारा सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूल, तांबेपुरा (अमळनेर) यांचा “Fun Festival” या आकर्षक थीमवर आधारित भव्य Annual Day कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मनोरंजनासोबतच जीवनमूल्यांचा संदेश देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या सोहळ्यातून प्रभावीपणे साकारला गेला.
या कार्यक्रमासाठी अमळनेर नगर परिषदेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम तसेच खानदेश शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष कमल कोचर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला.
कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना “Fun Festival” असली तरी सादरीकरणातून शिक्षणाचे जीवनातील महत्त्व, धैर्य, निडरता, संघभावना आणि सामाजिक मूल्ये यांचा सुंदर मिलाफ दिसून आला. चिमुकल्यांपासून इयत्ता सहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्याविष्कार, नाट्यप्रयोग आणि सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली. लहानग्यांच्या निरागसतेतून तर मोठ्या विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण अभिनयातून टाळ्यांचा कडकडाट होत राहिला.
विशेष म्हणजे, प्रत्येक सादरीकरणामध्ये मनोरंजनासोबत शिक्षण, संस्कार आणि धैर्याचा संदेश गुंफलेला होता. रंगमंचावरील प्रकाशयोजना, वेशभूषा, संगीत आणि नृत्यरचना यामुळे संपूर्ण कार्यक्रम एक रंगतदार महोत्सवासारखा भासला.
या यशस्वी सोहळ्यामागे शाळेचे चेअरमन श्री. महेश पाटील आणि मुख्याध्यापिका सौ. नूतन महेश पाटील यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे मुक्तपणे सादरीकरण, पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती आणि जीवनमूल्यांचा प्रभावी संदेश यामुळे हा Annual Day केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न राहता विद्यार्थी व पालकांसाठी प्रेरणादायी उत्सव ठरला.

