दिव्यांगांच्या हक्कासाठी आवाज बुलंद! अमळनेरमध्ये ५% राखीव निधी सरसकट वाटपाची मागणी; नगरपरिषदेला दिव्यांगांचे ठोस निवेदन
![]()
दिव्यांगांच्या हक्कासाठी आवाज बुलंद!
अमळनेरमध्ये ५% राखीव निधी सरसकट वाटपाची मागणी; नगरपरिषदेला दिव्यांगांचे ठोस निवेदन
अमळनेर प्रतिनिधी :
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ तसेच महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयांनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या किमान ५ टक्के निधी दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी खर्च करणे बंधनकारक असताना, अमळनेर नगरपरिषदेकडून हा निधी अत्यल्प लाभार्थ्यांपुरताच मर्यादित ठेवला जात असल्याचा गंभीर आरोप करत अमळनेर तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी नगरपरिषदेला निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नगरपरिषद अमळनेर दरवर्षी दिव्यांगांसाठी ५% निधीची तरतूद दाखवते; मात्र प्रत्यक्षात निधीचे वाटप टक्केवारीनुसार किंवा मोजक्या व्यक्तींनाच केले जाते. परिणामी तालुक्यातील अनेक पात्र, गरजू व कायदेशीर हक्क असलेले दिव्यांग व्यक्ती या योजनेपासून वंचित राहत आहेत. ही बाब केवळ अन्यायकारकच नाही तर दिव्यांग हक्क कायद्याच्या मूलभूत उद्देशालाच बाधा आणणारी असल्याचे दिव्यांग संघटनांचे म्हणणे आहे.
दिव्यांग प्रतिनिधींनी स्पष्ट केले की, निधी वाटप प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून लाभार्थी निवडीसाठी कोणती स्पष्ट निकष पद्धती राबवली जाते, याबाबत माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे निधी वितरणात समता आणि न्याय यांचा अभाव जाणवत आहे.
निवेदनाद्वारे पुढील महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत :
दरवर्षी लाभार्थ्यांची एकदाच अपंग प्रमाणपत्र पडताळणी करून पात्रतेची यादी निश्चित करावी.
५% निधीचे सरसकट, पारदर्शक आणि समप्रमाणात वाटप करावे.
निधी वितरणासाठी स्पष्ट व लेखी कार्यपद्धती जाहीर करावी.
कोणताही पात्र दिव्यांग व्यक्ती निधीपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने हमी द्यावी.
दिव्यांग व्यक्तींना सामाजिक व आर्थिक न्याय मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असून, निधी वाटपात होणारा विलंब, भेदभाव किंवा अपूर्ण प्रक्रिया ही प्रशासकीय निष्काळजीपणाचे लक्षण असल्याचेही निवेदनात ठळकपणे नमूद करण्यात आले आहे.
सदर निवेदनावर योगेश पाटील, फारुख शेख, कलीम शेख, अहमद खान व रामजू जैन या दिव्यांग प्रतिनिधींच्या सह्या असून, लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास पुढील टप्प्यात आंदोलनाचा इशाराही देण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.

