अमळनेरमध्ये घडला ऐक्याचा इतिहास : संत रविदास जयंतीला समाज एकत्र
1 min read

अमळनेरमध्ये घडला ऐक्याचा इतिहास : संत रविदास जयंतीला समाज एकत्र

Loading

अमळनेरमध्ये घडला ऐक्याचा इतिहास : संत रविदास जयंतीला समाज एकत्र

 

धार्मिक मर्यादा जपत शिस्तबद्ध शोभायात्रेने वेधले लक्ष

अमळनेर प्रतिनिधी ः संत शिरोमणी श्री रविदास महाराज यांच्या 649व्या जयंतीनिमित्त अमळनेर शहर व तालुक्यातील समस्त चर्मकार समाजाने एकजूट करून एक गाव एक मिरवणुकीची आदर्श प्रथा येथे प्रथमच सुरू केली. यापूर्वी शहर व तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या मिरवणुका निघत होत्या. मरिमाता मंदिराजवळील संत शिरोमणी श्री रविदास महाराज यांच्या मंदिरापासून शोभायात्रेस प्रारंभ झाला.
सर्वप्रथम मंदिरात समाजातील सर्व ज्येष्ठ बांधवांच्या हस्ते व महाराजांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर समाजातील सर्व माता- भगिनींनी पूजन केले. सर्वांना प्रसाद वाटप झाले. तेथून संत शिरोमणी श्री रविदास महाराज की जयची जोरदार घोषणाबाजी होवून शोभायात्रेस प्रारंभ झाला. शोभायात्रा माळीवाडा, भोई वाडा, कसाली मोहल्ला, वाडी चौक, सराफ बाजार, दगडी दरवाजा, मोठा बाजार, राणी लक्ष्मीबाई चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकमार्गे गांधलीपुरा येथे आल्यानंतर तेथील संत शिरोमणी श्री रविदास महाराज यांच्या मंदिरात पूजनाचा कार्यक्रम झाला. तेथे देखील शोभायात्रेत उपस्थित सर्वांनी पूजन व दर्शनाचा लाभ घेतला.
दरम्यान, शोभायात्रा मार्गावरील सर्व देवस्थान व महापुरूषांच्या प्रतिमा आणि पुतळ्यांना माल्यार्पण तथा पूजन करण्यात आले. गांधलीपुरा येथून शोभायात्रा पुन्हा श्री मरिमाता मंदिराजवळील महाराजांच्या मंदिराजवळ पोहोचल्यावर तेथे मिरवणुकीची सांगता झाली.
नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, गटनेते पंकज चौधरी, नगरसेवक दीपक चौगुले यांनी सराफ बाजारात शोभायात्रेत सहभागी होवून महाराजांच्या पालखीचे व प्रतिमेचे पूजन केले. शोभायात्रेत बॅण्ड पथकाने फक्त धार्मिक गिते, संत शिरोमणी श्री रविदास महाराज यांचे दोहे व महापुरूषांच्या जीवनचरित्रावर आधारीत गीतेच म्हटली. कोणत्याही प्रकारचे अशोभनिय गीते व नृत्य कटाक्षाने टाळण्यात आली. बहुतांश बांधव पांढरा ड्रेस व टोपी घालून सहभागी झाले होते. मिरवणूक अतिशय शिस्तबद्ध निघाली. ठिकठिकाणी पुष्पवृष्टीही करण्यात आली.
दरम्यान, मिरवणुकीत सहभागी झालेल्या मोठ्या संख्येतील समाजबांधव व महिलांच्या लक्षणीय उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *