समता, बंधुभाव आणि स्वाभिमानाचा संदेश : संत रविदास जयंती विशेष
![]()
‘ मन चंगा तो कठोती मे गंगा ‘
राष्ट्रीय संत गुरु रविदास यांचा जन्म फेब्रुवारी महिन्यात रविवारी माघ पौर्णिमा सन 1376 मध्ये वाराणसी येथे मांडूरगड या ठिकाणी झाला. जन्मवार रविवार असल्यामुळे रविदास असे नाव ठेवण्यात आले. अशी अनेक लेखकांची मते आहेत. संत शिरोमणी गुरु रविदास स्वतःच्या जन्माविषयी कथन करतात ___l
‘ काशी ढीग मांडुर स्थाना ,शूद्र वरन करन गुजराना ,l
मांडुरनगर लीन अवतारा, रविदास शुभ नाम हमारा ‘ ll
संत शिरोमणी गुरु रविदासांच्या वडिलांचे नाव रघु किंवा राघवदास आणि आईचे नाव करमादेवी , रघुराणी, रघुरुनिया असे होते. संत रविदास यांचा तेराव्या वर्षी सुंदर अशी सुकन्या लोणा यांच्याशी विवाह झाला.
चर्मकार जातीचा गौरवशाली इतिहास ____!
भारताच्या इतिहासात 1) प्राचीन भारताचा इतिहास 2) मध्ययुगीन भारताचा इतिहास 3) आधुनिक भारताचा इतिहास. प्राचीन भारताच्या इतिहासात जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था, स्पृश्य – अस्पृश्य असा भेदभाव नव्हता. आर्यांच्या आगमनानंतर सिंधू, द्रविड, अनार्य, मोहेंजोदडो आणि हडप्पा संस्कृती या काळात आमचे पूर्वज राजे होते. त्यात नाग , द्रविड, गौंड, शाख्य वंशीय , चिवर वंशीय होते. चिवर म्हणजे चर्मयुग ! अश्मयुगासारखे. चर्म – कातडे यांचे नाणे, चलन बनवणे. राजांना हवेसाठी चामड्याचा हातपंखा बनवणे अशा विविध वस्तू बनवण्याचा हा प्राचीन इतिहास आहे. हा इतिहास आर्य भारतात येण्यापूर्वीचा होता. प्राचीन भारतात सर्वात शेवटचा राजा बळीराजा होय. नंतर गणव्यवस्था संपवून वर्णव्यवस्था निर्माण केली. त्यात 1) ब्राह्मण- शिक्षण घेणे आणि देण्याचा अधिकार . 2) क्षत्रिय- शिक्षण घ्यावे परंतु देऊ नये.3) वैश्य- शिक्षण घेणेही नाही. आणि देणेही नाही. परंतु संपत्ती जमा करू शकतात.4) शूद्र- अतिशूद्र – वरीलपैकी कोणत्याही प्रकारचा अधिकार नव्हता. फक्त ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची सेवा आणि गुलामगिरी करणे एवढेच कार्य होते.
इंग्रज भारतात आल्यानंतर शिक्षणाला सर्वत्र सुरुवात झाली. त्यातूनच फुले, शाहू, आंबेडकर क्रांती झाली. आणि आरक्षणाचे जनक लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांनी 1902 मध्येच आरक्षण बहाल केले. आज आपला महाराष्ट्र याच लोकराजे शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महान महापुरुषांच्या विचारांची जडणघडण असलेला आहे. तरीही —!
” ऐसा चाहो राज मै , जहा मिले सबनको अन्न l
छोट बडो सभी सम बसै, रविदास रहे प्रसन्न ” ll
ज्यावेळी अशा कल्याणकारी राज्याची निर्मिती होईल की ज्या कल्याणकारी राज्यात सर्व स्त्री आणि पुरुष मानव जातीला पोटभर अन्न मिळेल तेव्हाच ती आनंदी राहतील. आजही 700 वर्ष उलटून गेली तरीही 2008 च्या सेनगुप्ता कमिटीच्या सर्वेक्षण अहवालानुसार 83 कोटी जनतेपैकी 29 कोटी बांधवांचे प्रतिदिन प्रति व्यक्ती उत्पन्न 6/- रुपये होते. 26 कोटी बांधवांचे प्रतिदिन प्रतिव्यक्ती उत्पन्न 11/- रुपये होते. 28 कोटी बांधवांचे प्रतिदिन प्रतिव्यक्ती उत्पन्न 20/- रुपये होते. अशा तुटपुंज्या उत्पन्नात त्या – त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होत असेल ? आज जगाचा पोशिंदा कष्टकरी शेतकरी असलेल्या बांधवाची अवस्था काय आहे ? म्हणून पाणी पिताना जसे आपण वेगवेगळ्या भांड्यांचा वापर करत असतो तसे तुझं – माझं करत करत आपल्या जीवनाची वाटचाल करतो. यासाठी वर्तनात परिवर्तन घडवून लोभा पासून दूर राहणे, आपल्या मनाचा मालक होणे, एकमेकांचा मान सन्मान करणे, पाणी आणि तेल यानुसार एकमेकांचा तिरस्कार न करता , दूध आणि पाणी याप्रमाणे एकजीव होणे ही आजच्या काळाची अत्यावश्यक नितांत गरज आहे. आपला अमूल्य वेळ आणि सुंदर मन आपसात भांडण तंट्यात खर्च करू नका . जीवन हे सतत बदलत असते. आपल्या या देहाच्या विसर्जनापासून कोणीही चुकलेला नाही. म्हणून आपण संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या कार्याची ओळख संपूर्ण मानव जातीला परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील राहावे.
” देश विकूनी पोटभरती ती गद्दाराची नीती,
त्यांना आपली लाज किती आणि लज्जा किती ?
मानव समाजात आहेत फक्त दोन आणि दोनच जाती,
स्त्री आणि पुरुष यांनाच मान द्यावा समाजाप्रती ” l
अशा या वागण्यामुळे माणसं जुळत नाहीत तर तुडवली जातात. म्हणूनच संत रविदासांनी वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था यांच्या विरोधात जन आंदोलन उभे केले होते. यासाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संत शिरोमणी गुरु रविदास यांच्या सन्मानार्थ ‘ द अनटचेबल ‘ हा ग्रंथ समर्पित केलेला आहे. संत शिरोमणी गुरु रविदास यांनी या वर्णव्यवस्थेलाच आव्हान देताना पुढील दोहा कथन केला आहे.
” चामके हम भी, चामके तुम भी l चामका है जग सारा, चामबिगर कौन है जीव, कहे रैदास हमारा ll
कोणत्याही संतांनी चमत्कार केलेला नाही. क्रांतीची बीजेच पेरली आहेत. संत गुरु रविदास यांच्या बाबतीत प्रलंबित भाकड कथांना आपण तिलांजली दिली पाहिजे. 3000 वर्षांपूर्वी होऊन गेलेले विश्वशांतीचे जनक बोधिसत्व गौतम बुद्ध यांचा वारसा पुढे चालवत सम्राट अशोक, संत गुरु रविदास, छत्रपती शिवाजी महाराज आणि आधुनिक युगात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज आणि संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होऊन गेले. आपल्या भारत देशात द्वितीय क्रमांकाची लोकसंख्या असलेला चर्मकार बांधव आहे तरीही ___l
“जात-पातके फेर मे, उलझ रहे सब लोग l
मनुष्यता को खा रहा है, रैदास जात का रोग ll
जात- जात में जात है, जो केले के पात l
रैदास माणूस न जुड सके, जब तक जातं न जात ll
जाती व्यवस्था मानतावाद धोक्यात आणते आणि मानवता धोक्यात आली की बंधुभाव आणि समता टिकून राहत नाही.
” पराधीनता पाप है, जान लेहुं रे मित l
रविदास दास पराधीन से, कोण करे है प्रीत ” ll
पराधीनता म्हणजे गुलामी ! दुसऱ्यांची सेवा करून लाचारीचे जीवन जगणे म्हणजे गुलामी. हीच गुलामी पाप असल्याचे गुरु रविदास वरील दोह्यात सांगतात. अशा गुलामांना कोणीही जवळ करत नाही, प्रेम देत नाही. अशा या गुलामीची विविध रूपे आहेत. शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि वैचारिक गुलामगिरी ! आपल्या बुद्धीचा वापर न करता दुसऱ्याच्या बुद्धीने काम करणे ही वैचारिक गुलामगिरी आहे. आणि हीच वैचारिक गुलामगिरी सर्वाधिक धोकादायक ठरते. समाज काही अंशी शिकला, कामधंद्याला लागला, राहणीमान सुधारले परंतु वैचारिक गुलामगिरी आजही कमी झालेली नाही. माणसाची हत्या होऊ शकते तशी विचारांची ही हत्या होत आहे. जेवढ्या जाती तेवढे गट आणि जेवढे गट तेवढे तट निर्माण झाले आहेत. म्हणून इतिहासाची पूजा न करता सिद्धांताची पूजा करावी.
बौद्ध धर्मात माघ पौर्णिमेचे महत्त्व आहे . संत रविदास यांच्या जवळपास 1860 वर्ष जन्मपूर्व गौतम बुद्धांनी वैशाली नगरीत सूचित केले होते की, आज पासून तीन महिन्यांनी मी महापरिनिर्वाण अवस्थेला जाणार आहे ! माघ पौर्णिमा भगवान बुद्धांना महापरिनिर्वानाचा घोषणा दिन म्हणून प्रसिद्ध आहे .जसे संत रविदास हे पौर्णिमेच्या दिवशी जन्मले त्याच प्रकारे दोन परिवर्तन महामानव भगवान गौतम बुद्ध आणि संत कबीर हे सुद्धा पौर्णिमेला जन्मलेले आहेत. संत रविदासांचा जन्म झाल्यानंतर त्यांचे नाव रैवतप्रत वरून रैवतदास असे ठेवण्यात आले. पुढे रैवतदासाचा अपभ्रंश होऊन रैदास झाले . त्याकाळी दास याचा अर्थ गुलाम नव्हता. गुलामाला तेव्हा पराधीन म्हटले जात होते. दास याचा अर्थ अनुयायी असा होता. दासांचा राजा शंबर यांच्या स्मरणार्थ दास हे नाव वापरले जात होते. बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेशात संत रोहिदासांना रैदास आणि रविदास या नावाने संबोधतात. महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात रोहिदास म्हटले जाते. रविदास हे नाव सूर्याशी निगडित आहे. रवी म्हणजे सूर्य. काव्यात सूर्य हा शोषित वंचित यांना जवळचा आहे. सूर्य हे समतेचे फार मोठे विश्वाचे प्रतीक आहे . अशा या महान राष्ट्रीय गुरु रविदास यांना जयंती निमित्त कोटी कोटी नमन ll
लेखक
डि.ए.सोनवणे
शहर अध्यक्ष
ओबीसी शिक्षक असोसिएशन अमळनेर

