दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गोड भेट , कै. बापुसो. मनोहर पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त समाजोपयोगी उपक्रम
![]()
पुण्यस्मरणाचा समाजोपयोगी आदर्श : दिव्यांग मुलांना मिष्ठान्न भोजन देणगी
अमळनेर प्रतिनिधी
दि. ३० जानेवारी २०२६ (शुक्रवार) रोजी पारोळा येथील चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा येथे कै. बापुसो. मनोहर विश्वासराव पाटील (माजी सरपंच) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हर्षल माने (माजी जि.प. सदस्य), ॲड. भुषण माने, तसेच श्री. संदेश माने (माजी शिक्षक) यांची उपस्थिती लाभली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. योगेश रघुनाथ महाजन यांच्या वतीने सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात मान्यवरांनी संस्थेचे कार्य, विशेषतः दिव्यांग मुलांच्या संगोपन व शिक्षणासाठी चालणाऱ्या सेवाभावी उपक्रमांचे कौतुक केले. महाजन सर व संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या निःस्वार्थ सेवेला विशेष दाद देण्यात आली.
कै. बापुसो. पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मिष्ठान्न भोजनासाठी ₹५,००० ची देणगी प्रदान करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकताना दिसला.
कार्यक्रमाला संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. पुण्यस्मरणाचा दिवस समाजोपयोगी कार्याने साजरा करत कै. बापुसो. यांच्या स्मृतींना अर्थपूर्ण अभिवादन करण्यात आले.

