महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या शैक्षणिक दिनदर्शिकेचे भव्य प्रकाशन, श्री अरुणनाथ गिरी महाराजांच्या हस्ते, राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती
![]()
महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या शैक्षणिक दिनदर्शिकेचे भव्य प्रकाशन,
श्री अरुणनाथ गिरी महाराजांच्या हस्ते, राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती
अमळनेर प्रतिनिधी :
महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या वतीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी प्रकाशित करण्यात येणाऱ्या शैक्षणिक दिनदर्शिकेचे यंदाचे प्रकाशन चैतन्य अडभंग नाथ तपोभूमी, भामा नगर (भामामठ), ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर येथे अत्यंत भक्तिमय व प्रेरणादायी वातावरणात पार पडले. सदर दिनदर्शिकेचे प्रकाशन मठाधिपती श्री श्री बालब्रह्मचारी अरुणनाथ गिरी जी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संघटनेच्या राज्याध्यक्ष सौ. शुभांगी ताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेमार्फत दरवर्षी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पदवीधर घटकांसाठी उपयुक्त अशी शैक्षणिक दिनदर्शिका प्रकाशित केली जाते. या दिनदर्शिकेमध्ये संघटनेने वर्षभरात शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांचा सचित्र आढावा, तसेच शैक्षणिक, प्रशासकीय व सेवा विषयक महत्त्वपूर्ण माहिती समाविष्ट असते. त्यामुळे राज्यातील शिक्षक व कर्मचारी वर्ग या दिनदर्शिकेची आतुरतेने वाट पाहत असतो.
विशेष बाब म्हणजे ही शैक्षणिक दिनदर्शिका दरवर्षी मोफत वितरित करण्यात येते. नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमधील प्रत्येक शाळेपर्यंत तसेच राज्यभर घरपोच स्वरूपात ती पोहोचवली जाते. गेल्या सात वर्षांपासून हा उपक्रम अव्याहतपणे सुरू असून, मागील वर्षी श्रीक्षेत्र सखाराम महाराज, अमळनेर संस्थानचे मठाधिपती श्री प्रसाद महाराज यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले होते. यंदा हा मान श्री अरुणनाथ गिरी महाराज यांच्या हस्ते लाभला.
या प्रसंगी श्री श्री बालब्रह्मचारी अरुणनाथ गिरी महाराज यांनी राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचा सत्कार केला. संघटनेने शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी राबवलेल्या उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक करत भावी कार्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
आपल्या मनोगतात राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील म्हणाल्या की, ही शैक्षणिक दिनदर्शिका पूर्णतः राजकारणविरहित आहे. समाजाला दिशा देणाऱ्या शिक्षकांसाठी असलेली ही दिनदर्शिका राजकीय व्यक्तींकडून नव्हे, तर ‘गुरूंच्या’ हातूनच प्रकाशित होणे अधिक योग्य आहे. म्हणूनच मागील दोन वर्षांपासून संत, महंत व धार्मिक गुरूंच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्याची परंपरा संघटनेने जाणीवपूर्वक जपली आहे.
सदर दिनदर्शिकेचे संकलन व निर्मिती महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष श्री राजेश जाधव सर व ॲड. विवेक सूर्यवंशी यांनी केली आहे. यावेळी त्यांनी दिनदर्शिकेच्या निर्मितीसाठी सहकार्य करणाऱ्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. लवकरच ही शैक्षणिक दिनदर्शिका राज्यातील प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचवली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

