नवोपक्रम स्पर्धेत ए टी झांबरे माध्यमिक विद्यालयातील उपक्रम जिल्ह्यात उत्कृष्ट*
![]()
*नवोपक्रम स्पर्धेत ए टी झांबरे माध्यमिक विद्यालयातील उपक्रम जिल्ह्यात उत्कृष्ट*
जळगांव प्रतिनिधी
राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० हे शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक व नवोन्मेषी शिक्षण देण्यावर भर देते. या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार विद्यार्थ्यांचा बहुआयामी विकास, कृतीशील शिक्षण, कौशल्याधिष्टीत शिक्षण, तंत्रज्ञानाचा शैक्षणिक उपयोग व शाळा समाज यांच्यातील सशक्त नाते विकसित करण्यावर विशेष भर दिला जात आहे. या अनुषंगाने विविध शाळांमध्ये राबविल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांना राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेच्या माध्यमातून दरवर्षी प्रोत्साहन दिले जाते. यासाठी राज्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व अधिकारी यांनी या स्पर्धेत सक्रीय सहभाग घेऊन शाळेत व कार्यक्षेत्रात राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम सादर करणे अपेक्षित आहे.
या राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना व्हावी तसेच सर्वच स्तरावरील शिक्षक व अधिकारी यांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी सदर स्पर्धा जिल्हा स्तरावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव मार्फत चालू शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी आयोजित करण्यात आली होती.
शैक्षणिक सृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
जिल्हा स्तरावर या स्पर्धेत ए टी झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव मधील शिक्षक श्री महेंद्र सोनजी नेमाडे यांनी माध्यमिक गटात सहभाग घेऊन *”गणित प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून संकल्पनात्मक स्पष्टता आणि सहभाग वाढवणे – नवोपक्रमात्मक गणित शिक्षणाचा मार्ग”* या विषयावर नवोपक्रम सादर करुन *जिल्हा स्तरावर प्रथम* क्रमांक पटकावला. तसेच विद्यालयातील शिक्षण सेविका श्रीमती रत्नमाला मोहन शिंदे यांनी प्राथमिक गटात सहभाग घेऊन *”जलदुत प्रकल्प”* हा नवोपक्रम सादर करुन जिल्हा स्तरावर व्दितीय क्रमांक पटकावला आहे.
श्री महेंद्र नेमाडे आणि रत्नमाला शिंदे यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या स्पर्धेतील यशाबद्दल के सी ई सोसायटी जळगाव चे अध्यक्ष मा. नंदकुमार बेंडाळे, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक श्री नरेंद्र पालवे आणि शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.

