एक अमळनेरकराचे नम्र आवाहन : राजकीय मतभेद थांबवा, विकासासाठी एकत्र या 
1 min read

एक अमळनेरकराचे नम्र आवाहन : राजकीय मतभेद थांबवा, विकासासाठी एकत्र या 

Loading

एक अमळनेरकराचे नम्र आवाहन : राजकीय मतभेद थांबवा, विकासासाठी एकत्र या

अमळनेर | विशेष प्रतिनिधी

अमळनेर तालुक्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चिंतन करत एका सजग अमळनेरकराने समाजहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे व नम्र आवाहन केले आहे. तालुक्याने एका दादांना आमदारकी व बाजार समितीची जबाबदारी दिली, तर दुसऱ्या दादांना नगरपालिकेचे नेतृत्व दिले. विशेष बाब म्हणजे दोघेही सत्तेत आहेत. मात्र सत्तेत असतानाही परस्परांवरील आरोप-प्रत्यारोप व राजकीय कुरघोड्या सुरूच असल्याने त्याचा थेट फटका तालुका व शहराच्या विकासाला बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या राजकीय संघर्षाला कुठेतरी पूर्णविराम मिळायला हवा. कारण या वादातून निघणारे निष्पन्न अमळनेरच्या प्रगतीस अडथळा ठरत आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी आपापल्या राजकीय ताकदीचा वापर करून आपल्या नेत्यांकडून तालुका व शहरासाठी भरघोस निधी आणावा. सूक्ष्म नियोजन (मायक्रो प्लॅनिंग) करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी व अमळनेर तालुका सुजलाम-सुफलाम करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

इतिहास साक्षी आहे की संघर्ष हा अस्तित्वासाठी किंवा अस्तित्व सिद्ध करण्यासाठी मर्यादित काळापुरताच योग्य असतो. तो जर सतत सुरू राहिला, तर अधोगती व विनाश अटळ ठरतो. आज जनता राजकीय भांडणांना कंटाळलेली आहे. अमळनेर ही संत सखाराम महाराजांची पावनभूमी, श्रीमंत प्रताप शेठजी व साने गुरुजी यांची कर्मभूमी आहे. ‘विप्रो’सारख्या जागतिक कंपनीचा मदर प्लांट येथे आहे, तसेच अतिदुर्मिळ मंगळ ग्रहाचे मंदिरही याच शहरात आहे. शांतता व जातीय सलोखा ही अमळनेरची ओळख असून ती कायम टिकवणे हे सर्व नेते व कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे.

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांत एकमेकांच्या विरोधात लढलेले नेते निवडणुकीनंतर दुसऱ्याच दिवशी कॅबिनेटमध्ये एकत्र बसतात, मग आपल्या गावासाठी आपण का भांडत बसायचे? हा विचार करण्याचा मुद्दा असल्याचेही या आवाहनात नमूद करण्यात आले आहे.

अमळनेरकर जनतेने स्मिताताईंना खासदार, अनिल दादांना आमदार व शिरीष दादांना नगरपालिकेची धुरा देत सर्व नेत्यांना न्याय दिला आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर सर्व मतभेद बाजूला ठेवून “एक अमळनेरकर” म्हणून एकत्र येऊन शहराच्या विकासाची नवी कहाणी लिहावी, असे स्पष्ट मत व्यक्त करण्यात आले आहे. अन्यथा भविष्यात जनतेच्या अपेक्षांना कंटाळून नवे नेतृत्व उभे राहिल्यास आश्चर्य वाटू नये, असा इशाराही देण्यात आला आहे.

नेत्यांनी आपल्या भोवतालच्या कान भरणाऱ्या, भांडणे लावणाऱ्या व्यक्तींना ओळखावे, तर खऱ्या अर्थाने ग्राउंड लेव्हलवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मान द्यावा, अशीही नम्र विनंती करण्यात आली आहे.

शेवटी —
“हिच आमुची प्रार्थना, अन् हेच आमचे मागणे,
माणसाने माणसाशी माणसासम वागणे…
सबका मंगल हो…!”

आपलाच,
अमोल दिनेश माळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *