प्रभू विश्वकर्मा सुतार समाज महिला मंडळाचा मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू व स्पर्धांचा उत्साहपूर्ण सोहळा
![]()
प्रभू विश्वकर्मा सुतार समाज महिला मंडळाचा मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू व स्पर्धांचा उत्साहपूर्ण सोहळा
मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क
दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री प्रभू विश्वकर्मा सुतार समाज महिला मंडळातर्फे मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रम व विविध स्पर्धांचे आयोजन अत्यंत उत्साहात पार पडले. या उपक्रमाअंतर्गत शुक्रवार, दिनांक १६ रोजी महिलांसाठी पाककला स्पर्धा व रेट्रो फॅशन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धांसाठी प्रमुख पाहुण्या व परीक्षक म्हणून समाजसेविका सौ. कृपाली अमित पाटील मॅडम यांची उपस्थिती लाभली. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली. स्पर्धांमध्ये समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे ज्येष्ठ व वृद्ध महिलांनीही तितक्याच उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रमात वेगळेच चैतन्य निर्माण केले. पाककलेतील पारंपरिक व नाविन्यपूर्ण पदार्थ तसेच रेट्रो फॅशनमधील आकर्षक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीनिमित्त पारंपरिक हळदी-कुंकू कार्यक्रम पार पडला. यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजक व गंमतीदार खेळांचे आयोजन करण्यात आले होते. तरुणींसह ज्येष्ठ महिलांनीही या खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत आनंद लुटला.
स्पर्धा व खेळांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ क्रमांक मिळविणाऱ्या महिलांना महिला मंडळातर्फे आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच समाजातील विधवा महिलांना या कार्यक्रमात सहभागी करून त्यांचा सन्मान करण्यात आला, ही बाब विशेष कौतुकास्पद ठरली.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रभू विश्वकर्मा सुतार समाज महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी मोलाचे योगदान दिले. सौ. जान्हवी बोरसे, सौ. भारती जगताप, सौ. शीतल खैरनार, सौ. साधना ताई शार्दूल, सौ. अनिता खैरनार, सौ. सुरेखा मोरे, सौ. मनीषा मिस्तरी, सौ. जयश्री देवरे व सौ. धनश्री खैरनार यांनी कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करून तो यशस्वी केला.
या उपक्रमामुळे महिलांमध्ये सामाजिक एकोपा वाढीस लागला असून सांस्कृतिक परंपरेचे जतन होत असल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली.

