उपजीविकेच्या संघर्षात हरवत आहेत लोककलावंत; वासुदेव परंपरा जपण्याचे मोठे आव्हान कधीकाळी गावागावांत भक्ती, संस्कृती आणि मनोरंजनाची परंपरा जपणारा वासुदेव आज उपजीविकेच्या संघर्षात; लोककलेच्या संरक्षणासाठी शासनाच्या ठोस धोरणाची गरज
![]()
उपजीविकेच्या संघर्षात हरवत आहेत लोककलावंत; वासुदेव परंपरा जपण्याचे मोठे आव्हान,
कधीकाळी गावागावांत भक्ती, संस्कृती आणि मनोरंजनाची परंपरा जपणारा वासुदेव आज उपजीविकेच्या संघर्षात; लोककलेच्या संरक्षणासाठी शासनाच्या ठोस धोरणाची गरज
अमळनेर प्रतिनिधी 🙁 दिनकरराव पवार)
“वासुदेव आला रे वासुदेव आला… सकाळच्या प्रहरी हरिनाम बोला…!” या मधुर स्वरांनी पहाटेची शांतता भंग करत संपूर्ण गावाला जागे करणारा वासुदेव आज काळाच्या पडद्याआड जात असल्याचे विदारक चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. एकेकाळी वासुदेवाच्या आगमनाने गावात भक्तिमय वातावरण निर्माण होत असे. त्याच्या गाण्यांनी, नृत्याने आणि वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषेने बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचेच मनोरंजन होत असे. मात्र, बदलत्या जीवनशैलीने आणि डिजिटल युगाच्या प्रभावाने ही समृद्ध लोकपरंपरा आता लोप पावत चालली आहे.
डोक्यावर मोरपिसांनी सजवलेली टोपी, रंगीबेरंगी पोशाख, गळ्यात माळा, हातात चिपळ्या आणि ओठांवर हरिनाम… अशी वासुदेवाची प्रतिमा ग्रामीण संस्कृतीचे जिवंत प्रतीक होती. वर्षातून किमान एकदा तरी तो प्रत्येक गावात येत असे. पहाटेच्या वेळी घराघरासमोर हरिनामाचा गजर करत गावाला जागे करणे, लोकांना सदाचाराचा संदेश देणे आणि भक्तीभाव जागवणे, हे त्याचे कार्य असे.
गावकऱ्यांकडून मिळणारे धान्य, कपडे किंवा रोख बिदागी यावरच त्याचा संसार चालत असे. गावातील प्रेम, आपुलकी आणि लोकांचा सन्मान हीच त्याची खरी कमाई होती. मात्र, आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, मोबाईल, सोशल मीडियाचे वाढते आकर्षण आणि बदलती सामाजिक मानसिकता यामुळे पारंपरिक लोककलांना पूर्वीसारखा प्रतिसाद मिळत नाही. परिणामी अनेक वासुदेव कलाकारांना उदरनिर्वाहासाठी इतर व्यवसाय स्वीकारावे लागत आहेत.
लोककला ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून ती भारतीय संस्कृतीची अमूल्य ओळख आहे. वासुदेवासारखे कलाकार समाजाला अध्यात्म, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देत होते. त्यांचे अस्तित्व संपुष्टात येणे म्हणजे आपल्या सांस्कृतिक वारशाचाच एक महत्त्वाचा दुवा तुटण्यासारखे आहे.
लोककलेचे जतन करण्यासाठी शासनाने वासुदेव, गोंधळी, पोतराज, वाघ्या-मुरळी यांसारख्या पारंपरिक कलाकारांसाठी विशेष मानधन योजना, आर्थिक सहाय्य, प्रशिक्षण, सांस्कृतिक महोत्सवांमध्ये प्राधान्य आणि शासकीय कार्यक्रमांत नियमित संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच नव्या पिढीपर्यंत या लोककला पोहोचविण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये विशेष उपक्रम राबविण्याची गरज आहे.
आजही एखाद्या गावात पहाटे “वासुदेव आला रे…” हा स्वर कानावर पडला की जुन्या आठवणी जाग्या होतात. मात्र, या स्वरांचे अस्तित्व पुढील पिढ्यांपर्यंत टिकवायचे असेल, तर लोककलेचे संरक्षण आणि कलाकारांचा सन्मान ही काळाची गरज आहे. अन्यथा उद्या वासुदेव फक्त इतिहासाच्या पानांमध्ये आणि आठवणींमध्येच उरेल.

